लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपचे अनेक नेते राजकारणाला रामराम ठोकताना दिसत आहेत. आधी गौतम गंभीर त्यानंतर जयंत सिन्हा यांच्यानंतर चांदनी चौक मतदार संघातील वर्तमान खासदार डॉ. हर्षवर्धन यांनीही राजकारणाला अलविदा केला आहे. रविवारी सोशल मीडिया प्लैटफॉर्म एक्सवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजुला होण्याची घोषणा केली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, ३० वर्षाच्या राजकीय करिअरनंतर आता पुन्हा आपल्या व्यवसायाकडे परतण्याची इच्छा आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कृष्णानगरमधील त्यांचे ENT क्लिनिक वाट पहात आहे.
भाजपने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील ७ पैकी ५ जागांवर उमेदवार दिले आहेत. या ४ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. चांदणी चौक मतदारसंघातून डॉ. हर्षवर्धन यांच्याऐवजी प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन यांच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचे हेच कारण आहे.
डॉ. हर्ष वर्धन यांनी 'एक्स' अकाउंटवर पोस्ट लिहित मोठा निर्णय जाहीर केला. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ३० वर्षांच्या राजकीय करिअरनंतर पुन्हा मूळ करिअरकडे वळू इच्छित आहे. कृष्णनगरमधील क्लिनिक माझं वाट पाहतंय. ३० वर्षाच्या काळात मी पाच विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुका लढवल्या. सर्व निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. त्याचबरोबर पक्ष संघटना, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. मात्र आता मूळ करिअरकडे परण्याची इच्छा आहे.