टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने राजकारण सोडणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट केली आहे. गौतम गंभीर सध्या भाजपकडून पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
वास्तविक, गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून गौतम गंभीर संसदेत पोहोचला. सध्या तो आयपीएल संघ कोलकाता कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटॉर आहे.
गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले, “मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट करिअरवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो”. गंभीरने ही पोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केली आहे.
गौतम गंभीर सध्या भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. २०१९ मध्ये त्याने मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी गंभीरने काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा ३,९१,२२२ मतांनी पराभव केला होता.
कोरोना महामारीच्या काळात गौतम गंभीरचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. ऑक्सिजन सिलिंडर, हॉस्पिटलमधील बेड तसेच इंजेक्शन्स अशा अनेक छोट्या-मोठ्या मदती गंभीरने कोरोना काळात केल्या.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने डिसेंबर २०१८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गंभीरने १४७ एकदिवसीय, ३७ टी-20 तसेच ५८ कसोटी सामन्यांमध्ये १० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
निवृत्तीनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तो खासदार झाला, पण पूर्णवेळ राजकीय नेता होऊ शकला नाही. खासदार होऊनही त्याच्यातला क्रिकेटर कधीच गेला नाही.
खासदार झाल्यानंतरही गौतम गंभीर कॉमेंट्रीमध्ये हात आजमावू लागला. आयपीएल दरम्यान तो कोचिंगही करायचा. तसेच, निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या टी-२० लीगमध्ये खेळतानाही दिसला.
संबंधित बातम्या