AAP Congress Seat Sharing Final : नितीश कुमार यांच्या पलटीनंतर ‘इंडिया’ आघाडी विस्कळीत होईल असं बोललं जात असतानाच या आघाडीतील पक्षांचे सूर पुन्हा जुळू लागले आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर आता आम आदमी पक्ष व काँग्रेसचंही जुळलं आहे. दोन्ही पक्षांनी चार राज्यांतील जागावाटपही जाहीर केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं शनिवारी युतीवर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीसह गुजरात, हरयाणा आणि गोव्यातील जागावाटपही दोन्ही पक्षांनी निश्चित केलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस २४, आप २, हरयाणात काँग्रेस ९, आप १ जागा, दिल्लीत 'आप' ४, काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.
गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भरूच आणि भावनगर या दोन जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार असतील, असं काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी सांगितलं.
हरयाणात लोकसभेच्या १० जागा आहेत. त्यापैकी ९ जागा काँग्रेस लढवणार असून कुरुक्षेत्रच्या एका जागेवर आम आदमी पक्षाचा उमेदवार लढेल, अशी माहिती वासनिक यांनी दिली.
दिल्ली व चंदीगडच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला होता. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतर हा पेच सुटला आहे. दिल्लीतील सात जागांपैकी आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीची जागा लढणार आहे. तर, काँग्रेस चांदनी चौक, ईशान्य आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवेल. गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असून चंदीगडची जागाही काँग्रेस सोडण्यास केजरीवाल तयार झाले आहेत.
पंजाबमध्ये युती होणार की नाही यावर दोन्ही पक्षांनी मौन पाळलं आहे. पंजाबमध्ये २०२२ साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं काँग्रेसचा पराभव करत राज्याची सत्ता ताब्यात घेतली होती. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १३ जागा लढवण्याची घोषणा आधीच केली आहे. इथं दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं जातं.