मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News: वरळीतील श्रीराम मिलमध्ये जलवाहिनी फुटली; रस्त्यावर पाण्याचे फवारे, हजारो लीटर पाणी वाया

Mumbai News: वरळीतील श्रीराम मिलमध्ये जलवाहिनी फुटली; रस्त्यावर पाण्याचे फवारे, हजारो लीटर पाणी वाया

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 12:08 PM IST

Pipe Line Burst In Worli : मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच आता वरळीत जलवाहिनी फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pipe Line Burst In Worli Mumbai
Pipe Line Burst In Worli Mumbai (HT)

Pipe Line Burst In Worli Mumbai : मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच आता मुंबईच्या वरळीत भलीमोठी जलवाहिनी फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीतील श्रीराम मिल परिसरातील जलवाहिनीद्वारे उच्चदाबानं पाणीपुरवठा होत असताना पाईपलाईन फुटल्यामुळं हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाया गेलं आहे. जलवाहिनी फुटल्यामुळं श्रीराम मिल परिसर जलमय झाला होता, त्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर कामगारांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईच्या वरळी परिसरात बीएमसीच्या कंत्राटदाराकडून मलजलवाहिनीचं काम सुरू आहे. त्यावेळी काम सुरू असतानाच जलवाहिनी फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जलवाहिनी फुटल्यामुळं पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जलवाहिनी फुटल्यापासून रस्त्यावर हजारो लीटर पाणी वाया गेलं असून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं आता लवकरात लवकर जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरळीतील श्रीराम मिल परिसरात जलवाहिनीतून पाणी गळत होतं. परंतु याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळंच आता जलवाहिनी फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळं रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आता पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच वरळीत जलवाहिनी फुटल्यामुळं पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग