पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश कस्टम विभागाने केला. एका महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल २० लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. हे सोने भुकटी स्वरूपात कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमाशुक्ल विभागाने या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला दुबईहून आलेल्या विमानातून पुण्यात उतरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला सोने घेऊन येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चेकिंग वाढवली होती. दरम्यान, एक महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर जाताना सुरक्षा रक्षकांना आढळली. यामुळे त्यांचा संशय बळावला. याची माहिती त्यांनी कस्टमच्या पथकाला देऊन त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, महिलेची चौकशी सुरू केली असता महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३ ग्रॅम ४१ मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. महिलेने गुप्तांगात सोने लपवून आणल्याने अधिकारी देखील चक्रावले होते.
संबंधित बातम्या