अजित पवारांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर अजित पवारांनी सांगितले की, पक्षातील बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या गटात दावे प्रतिदावे होत आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर अजित पवार गटाने जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याचं जाहीर केलं. या सर्व घडामोडींदरम्यान अजित पवारांना समर्थन केलेल्या आमदारांच्या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांचं देखील नाव असल्याची चर्चा होती.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्याशी सुप्रिया सुळे आणि अजित पवार दोघांनी संपर्क साधला होता. दोन्ही गटाकडून त्यांना विचारणा झाली होती. पण नवाब मलिक तटस्थ असून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याची माहिती आहे.
मनी लॉड्रींग केल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.