Rajya Sabha Election 2024 : येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांना पक्षानं संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा संधी देणं पक्षानं टाळलं आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यावयाच्या आहेत. संख्याबळानुसार भाजप-शिंदे व अजित पवार गटाच्या महायुतीचे पाच उमेदवार सहज निवडून येणार आहेत. सहाव्या उमेदवारासाठीही भाजपनं मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, तूर्त भाजपनं तीन उमेदवार भाजपनं घोषित केले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. भाजप चौथा उमेदवार घोषित करणार का याविषयी उत्सुकता आहे.
केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं राणे यांची संधी हुकल्याचं बोललं जात आहे. राणे यांना भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार आहेत.
पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षानं त्यांची नाराजी दूर केली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना मतदारसंघ सोडावा लागला होता. त्यामुळं त्या नाराज होत्या. भाजपचा पाठीराखा असलेल्या ब्राह्मण मतदारांमध्येही नाराजी होती. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देऊन पक्षानं ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, ही दोन्ही नावं पुन्हा एकदा मागे पडली आहेत. पंकजा मुंडे यांना मराठवाड्यातील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातील होते. यापूर्वी त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
संबंधित बातम्या