मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : पुणे पोटनिवडणुकांच्या तोंडावर मनसैनिकांची महत्त्वाची बैठक

Raj Thackeray : पुणे पोटनिवडणुकांच्या तोंडावर मनसैनिकांची महत्त्वाची बैठक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2023 10:40 PM IST

Pune Bypoll Election: आगामी पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडीसह मनसेनेही कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray
Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray (PTI)

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपने काल त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली आहेत. परंतु, पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन पुणे पोटनिवडणुकीच्या शर्यतीत उतरणार असल्याची राज ठाकरे यांनी घोषणा केली होती. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत मनसेदेखील मैदानात उतरणार असून सोमवारी आपल्या उमेदवाराची नावे जाहीर करणार आहेत. यामुळे पुणे पोट निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असतील. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी पाहणार आहेत. कसब्यातून मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. पण राज ठाकरे कोणाच्या नावासमोर शिक्कामोर्तब करतात? हे लवकरच स्पष्ट होईल.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, चिंचवड मतदार संघातून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचेही उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर, चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

IPL_Entry_Point