मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Budget: मुंबईचा विकास, हेच आमचे उद्दिष्ट; महापालिकेच्या अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

BMC Budget: मुंबईचा विकास, हेच आमचे उद्दिष्ट; महापालिकेच्या अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2023 06:37 AM IST

Brihanmumbai Municipal Corporation 2023: मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde On BMC Budget 2023
Eknath Shinde On BMC Budget 2023 (PTI)

Maharashtra CM Eknath Shinde On BMC Budget 2023-2024: मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. आगामी अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंबईचा यंदाचा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा आणि विकासाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"मुंबईचा अर्थसंकल्प हा मुंबईच्या विकासाचा, नागरिकांच्या हिताचा अर्थसंकल्प आहे. ज्यात मुंबईतील रस्ते पक्के, आरोग्य सुविधा, बाळासाहेब ठाकरेंचा दवाखाना बांधला जाईल, शहरातील रुग्णालयांची संख्या वाढेल, एमआरआय, सीटी-स्कॅन, डायलिसिस मशीन वाढवण्यात येणार आहेत. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर टॉवर उभारण्यासाठी बजेटमध्ये तरतूद आहे. मुंबईचा विकास करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे", असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तेट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे. महत्त्वाचे म्हणजे, नवीन करवाढीची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

IPL_Entry_Point

विभाग