मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll : पुणे पोटनिवडणुकीत पैशांची मुक्त उधळण; चिंचवडमध्ये १४ लाख, तर कसब्यात २८ लाखांची रोकड ताब्यात

Pune Bypoll : पुणे पोटनिवडणुकीत पैशांची मुक्त उधळण; चिंचवडमध्ये १४ लाख, तर कसब्यात २८ लाखांची रोकड ताब्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 25, 2023 06:19 AM IST

Pune Bypoll : पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा काल शांत झाला. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीकडून छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काल नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने चिंचवड मतदार संघात १४ तर कसबा मतदार संघात २८ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली.

Pune Bypoll election
Pune Bypoll election

पुणे : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम काल शांत झाली. तब्बल दोन आठवड्यापासून दोन्ही मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते पुण्यात तळ ठोकून होते. या काळात अनेक आरोप प्रत्यारोप करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) चिंचवडमध्ये १४ लाख तर कसब्यात २८ लाख रुपयांची रोकड जप्त केली.

चिंचवड येथील दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनात १४ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाने जप्त केली, या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ याबाबत आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

तर, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

एसएसटी पथकाद्वारे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून २४ तास हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने बारकाईने नजर ठेवली जात आहे. पथक नाका, चेकपोस्ट अशा ठिकाणी तपासणी करीत असून या मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासात अधिक बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु असून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व सबंधित पथकांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग