मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video: केस ओढले, खाली पाडले… केजरीवाल मुंबईत असताना दिल्ली पालिकेत भाजप-आप नगरसेवकांमध्ये तुफान राडा

Video: केस ओढले, खाली पाडले… केजरीवाल मुंबईत असताना दिल्ली पालिकेत भाजप-आप नगरसेवकांमध्ये तुफान राडा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2023 08:57 PM IST

Delhi MCD Clashes News in Marathi : दिल्ली महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षांच्या निवडीदरम्यान आज भाजप व आप नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Delhi MCD (Photo: ANI)
Delhi MCD (Photo: ANI)

Delhi MCD AAP BJP Clashes : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुंबई दौऱ्यावर असताना दिल्ली महापालिकेत आज अभूतपूर्व घटना घडली. महापालिकेतील विविध महत्त्वाच्या पदांच्या निवडीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आम आदमी पक्षात सुरू असलेल्या संघर्षाचा आज स्फोट झाला. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये अक्षरश: हाणामारी झाली.

ट्रेंडिंग न्यूज

मागील वेळी महापालिका सभागृहात एकमेकांवर खोटी सफरचंद आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या होत्या. आज त्यापुढं जाऊन एखाद्या रस्त्यावरच्या गुंडाला शोभेल असं लज्जास्पद कृत्य नगरसेवकांनी केलं. एकमेकांचे केस ओढण्यापासून खाली पाडून धक्काबुक्की करण्यापर्यंत या नगरसेवकांची मजल गेली. यात एक नगरसेवक चक्क बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. या हाणामाराचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

दिल्ली महापालिकेच्या सभागृहात आज सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू होता. या गोंधळातच स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी मतदान झालं. मात्र, महापौर निकाल जाहीर करत असताना अचानक काही नगरसेवक महापौरांच्या दिशेनं गेले. तिथं असलेल्या मार्शलनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळं आम आदमी पक्षाचे काही नगरसेवक पुढं आले आणि वादाची ठिणगी पडली आणि पुढं हे प्रकरण थेट हाणामारीपर्यंत गेलं. भाजप आणि आपचे नगरसेवक अक्षरश: एकमेकांवर तुटून पडले.

कुणी कुणाचे केस ओढले, कुणी कुणाला जमिनीवर पाडले तर कुणी चित्रपटातील अॅक्शन हिरोप्रमाणे उड्या मारून हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात आम आदमी पक्षाचे नगरसेवक अशोक कुमार मनू हे बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना अक्षरश: रडू कोसळलं. मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर रडत-रडतच त्यांनी आपल्यावर व महापौरांवर हल्ला झाल्याचं सांगितलं.

IPL_Entry_Point