मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba Peth Bypoll : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात झळकणाऱ्या या पाट्यांचा अर्थ काय?

Kasba Peth Bypoll : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात झळकणाऱ्या या पाट्यांचा अर्थ काय?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 24, 2023 05:38 PM IST

Kasba Peth Bypoll : कसब्यातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात लागलेल्या पुणेरी पाट्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

Kasba Peth Pune Bypoll
Kasba Peth Pune Bypoll (HT)

Kasba Peth Pune Bypoll : पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपनं हेमंत रासने तर कॉंग्रेसनं रविंद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं दोन्ही उमेदवारांनी मतदारांना विकासकामांचं आश्वासन देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय भाजपा आणि महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी कसब्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला आहे. परंतु आता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ कसब्यातील अनेक घरांच्या गेटवर लागलेल्या पुणेरी पाट्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 'यंदा कसब्यात धंगेकरच' असा हॅशटॅग वापरून कसब्यातील अनेक ठिकाणी पुणेरी पाट्या झळकल्या आहेत.

फेसबुकवर छाया थोरात यांनी शेयर केलेल्या पोस्टनुसार कसब्यातील एका घरावर 'बेल वाजवूनही दार उघडले नाही तर घरातील सर्व मते धंगेकरांना मिळणार असल्याचे समजावे', असं सांगण्यात आलं आहे. कारण मविआसह भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी डोअर-टू-डोअर प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं धंगेकर समर्थकांनी भाजपच्या लोकांनी प्रचारासाठी घरात येऊ नये, यासाठी वेगळीच क्लुप्ती लढवली आहे. याशिवाय दुसऱ्या एका पुणेरी पाटीत 'सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठा या धंगेकरांसोबत आहेत, काळजी नसावी', असं सांगण्यात आलं आहे. पेठांच्या भागांमध्ये दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर आता या पुणेरी पाटीचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.

Puneri Pati In Kasba Peth
Puneri Pati In Kasba Peth (HT)

'सोने, चांदी सर्व काही स्वीकारलं जाईल परंतु मत मात्र धंगेकरांनाच दिलं जाईल', असंही कसब्यातील एका पुणेरी पाटीवर लिहिण्यात आलं आहे. रविवार पेठेसह अन्य भागांमध्ये मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची मोठी पकड आहे. त्यामुळं आता त्यांच्या समर्थकांकडूनच या पुणेरी पाट्या लावण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणेरी पाट्या लावण्यासाठी पुण्याचा मध्यवर्ती भाग (कसबा पेठ) नेहमीच प्रसिद्ध मानला जातो. मात्र यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पाट्या लावण्यात आल्यामुळं त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Puneri Pati In Kasba Peth
Puneri Pati In Kasba Peth (HT)

पुण्यात पुणेरी पाट्यांचं महत्त्व काय आहे?

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील दुकानं, शॉप्स, सोसायट्या आणि घरांवर अशा प्रकारच्या पाट्या लावण्यात येतात. पुण्याच्या मध्यवर्ती भागांमधील नागरिक दुपारी एक ते चार वाजेपर्यंत झोपण्यासाठी वेळ काढत असल्यामुळं या वेळेत कुणीही डिस्टर्ब करू नये आणि पाटी वाचून लोकांनी त्याचं पालन करावं, यासाठी पुणेकर पाट्या लावत असतात, असं बोललं जातं. यंदा पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या समर्थनार्थ पुणेरी पाट्या लागल्यामुळं कसब्यात मविआच्या बाजूनं वातावरणनिर्मिती होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point