मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची एकजूट शक्य वाटत नाही - कुमार केतकर

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची एकजूट शक्य वाटत नाही - कुमार केतकर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 08, 2023 06:25 PM IST

Kumar Ketkar on opposition unity at national Level : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २०२४ साली राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची शक्यता नाही, असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं.

Kumar Ketkar
Kumar Ketkar

Kumar Ketkar on Congress : 'देशात संभ्रमित वातावरण आहे आणि त्यात बदल व्हायला हवा असं केवळ निवडक लोकांना वाटून चालणार नाही. ते देशात बहुसंख्येनं असलेल्या मध्यमवर्गालाही वाटलं पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर २०२४ साली नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजकीय एकजूट होईल असं वाटत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तरी ते शक्य वाटत नाही, असं परखड मत ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी मांडलं.

ट्रेंडिंग न्यूज

ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे लिखित व ग्रंथाली प्रकाशित 'संभ्रमित काळाच्या नोंदी' या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी मुंबईत झालं. त्यावेळी कुमार केतकर बोलत होते. पुस्तकाच्या शीर्षकाचा धागा पकडूनच त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. 'सत्तरच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र आले त्यास अनेक कारणं होती. आज ती परिस्थिती नाही. काँग्रेसनं प्रयत्न करूनही त्यांना एकजूट करण्यात यश येताना दिसत नाही. तामिळनाडूत अण्णाद्रमुक साथ देत नाही. ओडिशात बीजू जनता दल विचारत नाही. आम आदमी पक्ष काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकांना येण्यासही तयार नाही. ममता बॅनर्जी मानत नाहीत. अखिलेश यादव व मायावती देखील अंतर राखून आहेत. अगदी काँग्रेसशी जवळीक आहे असं वाटणाऱ्या राष्ट्रवादीसारख्या पक्षांनीही काही बाबतीत आडकाठी केली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकजूट होईल यावर माझा विश्वास नाही, असं ते म्हणाले.

'देशात महागाई, बेरोजगारी यामुळं भाजपविरोधी भावना आहे. १२०० रुपयांचा सिलिंडर ज्याला परवडतो, तो बोलणार नाही, पण उरलेले बोलतीलच! त्यामुळं भाजपविरोधी मतदान होऊ शकतं. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक विरोधी पक्षाला मतदान झालं आणि भाजपचं मताधिक्य कमी झालं, तर भाजप सत्तेत कमकुवत होऊ शकतो. मात्र, भाजपनं निवडणूक लढवण्याचं वेगळंच तंत्र विकसित केलं आहे. काँग्रेसनं आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, अशा पद्धतीनं युद्ध म्हणून निवडणूक लढवण्याचा अनुभव काँग्रेसकडं नाही, असं केतकर म्हणाले. 

'केवळ १८२ जागा मिळाल्या असताना एकेकाळी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं होतं. त्यामुळं मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या जागा ३०३ वरून थेट १८२ येतील का हा देखील प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे यावेळी उपस्थित होते.

संभ्रमित वातावरण अचानक निर्माण झालेलं नाही!

सध्याच्या संभ्रमित वातावरणाची बीजं १९९२ सालीच पडली होती. अनिवासी भारतीयांशी चर्चा करताना ते दिसू लागलं होतं. भारताबाहेर असलेले ९९ टक्के लोक आजच्या मोदी राजवटीच्या प्रेमात आहेत. साठ-सत्तरच्या दशकात अवघ्या १७ रुपयांत किंवा सवलतींमुळं मोफत आयआयटी झालेले अनिवासी भारतीय देखील मागील ७० वर्षांत देशात काहीच झालेलं नाही असं म्हणतायत. सुबत्ता हे याचं कारण आहे. यापूर्वीच्या चळवळी आणि राजवटींचा या सुबत्तेत वाटा आहे हेच मुळी अनेकांच्या लक्षात येत नाही, याबद्दल केतकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

IPL_Entry_Point

विभाग