Mamata Banerjee On Employees Protest : गेल्या काही महिन्यांपासून अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पश्चिम बंगालमध्येही कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आल्यानंतर याच प्रकारे राज्यातील कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु आता स्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन करत खडेबोल सुनावले आहे. त्यामुळं आता त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आंदोलकांनी माझं मुंडकं जरी छाटलं तरी त्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांइतका महागाई भत्ता मिळू शकणार नाहीये. कारण बंगाल सरकारकडे त्यासाठी आवश्यक पैसे नाहीयेत. बंगालमध्ये टीएमसीचं सरकार आल्यानंतर आम्ही आतापर्यंत तब्बल १०५ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवलेला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना फटकारलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
आंदोलकांना नेमकं काय आणि किती हवंय?, माझा शिरच्छेद केल्यानंतर कर्मचारी संतुष्ट होतील का?, तुम्हाला मी आवडत नसेल तर माझं मुंडकं छाटा, परंतु तुम्हाला महागाई भत्ता मिळू शकणार नाही. गेल्या महिन्यातच बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कर्मचारी संघटनांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची मागणी करत आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर आता त्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्यामुळं यावरून तृणमूल आणि भाजपा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या