नवी मुंबईत शनिवारी (१३ जानेवारी) उलवे येथील सीवूड सेक्टर ४४ मधील बिल्डर मनोज सिंह (वय ३९) यांच्यावर कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. डोक्यात गोळी लागल्याने बिल्डरचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मनोज सिंह यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुनम सिंह (३४) आणि राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांची पत्नी पुनम व राजू यांच्यात अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. दोघांनी सिंह यांची संपत्ती हडप करण्यासाठी त्यांच्या हत्येचे षड्यंत्र रचले. मनोज सिंह यांच्या नवी मुंबईतील सेक्टर ४४ मधील कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या कार्यालयात घुसून त्यांची हत्या केली होती. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता.
हत्या करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांच्यावर फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. तपासादरम्यान पोलिसांना मनोज सिंह याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाली. या दृष्टीने तपास केल्यानंतर ही हत्या पत्नी पुनम सिंह आणि तिचा प्रियकर राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान यांनीच केल्याचे समोर आले. मनोज यांची संपत्ती हडपण्यासाठीच ही हत्या केल्याचं आरोपींनी कबुल केलं आहे.
संबंधित बातम्या