मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election: नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसविरोधात ऑपरेशन कमळ?; माजी मंत्र्याच्या ट्वीटमुळं रंगली चर्चा

MLC Election: नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसविरोधात ऑपरेशन कमळ?; माजी मंत्र्याच्या ट्वीटमुळं रंगली चर्चा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 13, 2023 07:34 PM IST

Dilip Walse Patil on Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसच्या झालेल्या नाचक्कीमागे भाजप असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis - Satyajeet Tambe
Devendra Fadnavis - Satyajeet Tambe

Dilip Walse Patil on operation Lotus : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाकडून एबी फॉर्म मिळून अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांनी आपला मुलगा सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं काँग्रेस पक्षाची नाचक्की झाली आहे. मात्र, हा साधासरळ प्रकार नसून हे 'ऑपरेशन कमळ' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या ट्वीटमुळं या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम होता. काँग्रेसकडून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे इच्छुक होते. त्यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षावर दबावही वाढवला होता. मात्र, काँग्रेसनं दबावाला न जुमानता त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं सत्यजीत यांनी नमतं घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यामुळं काँग्रेसची कोंडी झाली.

या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपच होता, असं आता बोललं जाऊ लागलं आहे. सत्यजीत तांबे यांना आपल्याकडं वळवून महाविकास आघाडीची विधान परिषदेतील सदस्य संख्या कमी करण्याचा हा डाव असल्याचं समोर आलं आहे.

‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?,’ असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटचा रोख थेट भाजपवरच असल्याचं स्पष्ट आहे.

IPL_Entry_Point