आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी (८ मे) लखनौ सुपर जायंट्सचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दारूण पराभव झाला. या सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक आणि उद्योगपती संजीव गोएंका हे चांगलेच संतापलेले दिसले. त्यांनी भर मैदानात लखनौचा कर्णधार केएल राहुलवर संताप व्यक्त केला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपरजायंट्स आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. या संघाने पुढील दोन सामने जिंकले तरच प्लेऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी शक्यता आहे. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका यांचा राहुलसोबतचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते राहुलसोबत काहीतरी बोलताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लखनौचे मालक आणि केएल राहुलचे संबंध बिघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु लखनौ सुपर जायंट्सच्या मॅनेजमेंटने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये एलएसजीने राहुलला विक्रमी १७ कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि त्याला कर्णधार बनवले.
एलएसजीची यंदाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. चालू मोसमानंतर मोठा लिलाव होणार आहे. यामध्ये एलएसजी राहुलला रिटेन करणार नाही, असे बोलले जात आहे. पण मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की ते राहुलला त्यांच्यासोबत कायम ठेवतील.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लखनौने २० षटकात १६५ धावा केल्या होत्या. तर केएल राहुलने अतिशय संथ फलंदाजी करत ३३ चेंडूत केवळ २९ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात हैदराबादने त्याच पीचवर अवघ्या ९.४ षटकात बिनबाद १६७ धावा करत सामना जिंकला.
अशा परिस्थितीत सामना संपल्यानंतर संजीव गोएंका राहुलवर चिडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे संजीव गोएंका चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मीडियावर चाहते लखनौ संघाच्या मालकावर जोरदार टीका करत आहेत आणि त्यांच्या क्रिकेट ज्ञानावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. संजीव गोएंका यांनी जे काही केले ते सार्वजनिक ठिकाणी करायला नको होते, हवे तर ते बंद खोलीत राहुलसमोर आपली नाराजी व्यक्त करू शकले असते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या