आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी वादळ आणले आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७ षटकात २१० धावांची विक्रमी भागीदारी केली.
यावेळी दोघांनी शतकं ठोकली. या शतकांच्या बळावर गुजरातने चेन्नईसमोर २३२ धावांचे लक्ष्य ठेवले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ३ गडी गमावून २३१ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने ५५ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या तर साई सुदर्शनने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या.
तत्पूर्वी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने अवघ्या २५ चेंडूत पहिले अर्धशतक झळकावले. यानंतर शुभमनने पुढच्या २५ चेंडूत आणखी पन्नास धावा केल्या आणि ५० चेंडूत शतक पूर्ण केले. गिल आयपीएल २०२४ मध्ये पहिल्यांदाच अशा फॉर्ममध्ये दिसला आहे आणि ही खेळीही त्याच्या आवडत्या मैदानावर आली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि शुभमन गिलसह साई सुदर्शनने दमदार सुरुवात केली. गिलने त्याच्या आवडत्या मैदानावर सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली. पहिल्याच षटकात मिचेल सँटनरविरुद्ध एक चौकार आणि एक षटकार ठोकत गिलने आपले इरादे स्पष्ट केले.
यानंतर शुभमनने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पन्नास धावा केल्यानंतर, गिलने आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आणि एकूण ५० चेंडूंमध्ये आयपीएल इतिहासातील चौथे अर्धशतक झळकावले. गिलने शतक पूर्ण करताना ९ चौकार आणि ६ षटकार मारले.
शुभमन गिललाही दुसऱ्या टोकाकडून साई सुदर्शनची चांगली साथ लाभली. सुदर्शननेही सुरुवातीपासूनच खळबळ उडवून दिली आणि चेन्नईच्या गोलंदाजांना दणके दिले. सुदर्शनने अवघ्या ३१ चेंडूत षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. सुरदर्शनने शानदार फलंदाजी करत ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
गुजरात टायटन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. या हंगामात संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून, त्यापैकी केवळ ४ सामने संघाने जिंकले आहेत. त्याचवेळी संघाला ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. उर्वरित ३ सामने जिंकल्यानंतरही गुजरातचे केवळ १४ गुण असतील. तसेच, संघाचा नेट रनरेटही इतर संघांच्या तुलनेत खूपच कमी आहे.