मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik bus Accident : नाशिक बस अपघाताच्या चौकशीचे सरकारचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Nashik bus Accident : नाशिक बस अपघाताच्या चौकशीचे सरकारचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 13, 2023 11:37 AM IST

Eknath Shinde on Nashik Bus Accident : नाशिक-नगर हायवेवरील बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde (HT_PRINT)

Eknath Shinde on Nashik Bus Accident : नाशिक-शिर्डी महामार्गावर आज पहाटे झालेल्या बस अपघाताची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. जखमींवर तातडीनं आवश्यक ते उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

ठाणे जिल्ह्यातून साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या बसला आज पहाटे महामार्गावरील वावी पाथरे गावाजवळ अपघात झाला. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ जण जखमी झाले आहेत. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अपघाताचं वृत्त समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीनं शिर्डी व नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत. तसंच, हा अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. 'हे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी प्रार्थना करतो, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

IPL_Entry_Point