Maharashtra Weather update: पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आर्द्रता घेऊन राज्यात येत आहेत. यामुळे राज्यात थंडी वाढणार असून काही भागात हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तासात विदर्भातील काही जिल्ह्यात हा अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी कायम आहे. पुण्यात बुधवारी १० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुण्यासह मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी कायम आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आर्द्रता घेऊन राज्यात येत आहेत. उत्तर भारतावर तीव्र स्वरूपाचे जेट स्ट्रीम आहे आणि एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तान वरून उत्तर पश्चिम भारतावर येत आहे. यामुळे पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, पुढील ४८ तासात किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ असल्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पाच फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहील. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात पुढील ७२ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच हलके धुके पडण्याची शक्यता आहे. हवामानात मनात अंदाजे चार डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. पाच, सहा व सात फेब्रुवारीला कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार पाच व सहा फेब्रुवारीला दिवसा थंडी जाणवेल.
देशात उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात हा पाऊस होणार आहे. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथे काही भागात हीमवृष्टि होणार असल्याचा अंदाज आहे.