Maharashtra Weather Update : देशात उत्तरेत थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तापमानात ३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले असून सर्वत्र धुक्यामुळे जणजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्येही तापमानात मोठी घट झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस तापमानात आणखी घट होणार आहे. महाराष्ट्रात देखील पुढील दोन ते तीन दिवस तापमानात मोठी घट होणार आहे. राज्यात सकाळी आणि रात्री थंडी तर दिसवा ऊन नागरीक अनुभवत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ४ ते ५ दिवसांत उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीत वाढ होणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडीच्या तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, १७ नंतर थंडीच घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण पंजाब तसेच बिहारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे.
महाराष्ट्रात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान कोरडे राहणार आहे. तर काही ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात १५ तारखेपर्यंत २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात देखील एक ते दोन डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील २४ तासात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचे सावट दूर झाले आहे. दोन-तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी पुढील काही दिवस राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.