मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 10 December 2022 Live : ‘पठाण’मध्ये दिसणार दीपिका पदुकोणचा सुपर बोल्ड लूक!

Live Blog

Marathi News 10 December 2022 Live : ‘पठाण’मध्ये दिसणार दीपिका पदुकोणचा सुपर बोल्ड लूक!

05:22 PM ISTDec 10, 2022 10:52 PM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Sat, 10 Dec 202205:21 PM IST

विक्रोळीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात  महिला गंभीर जखमी

गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचा पहिला मजला कोसळला. या दुर्घटनेत एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. सूर्या नगर, विक्रम ग्लास कंपनीजवळ, विक्रोळी येथे ही घटना घडली. सुजाता कवाळे (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sat, 10 Dec 202210:23 AM IST

Deepika Padukone: ‘पठाण’मध्ये दिसणार दीपिका पदुकोणचा सुपर बोल्ड लूक!

‘बॉलिवूड किंग’ अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या चित्रपटात दीपिका पदुकोण एका सुपरबोल्ड लूकमध्ये दिसणार आहे. यशराज बॅनरच्या या आगामी चित्रपटातील दीपिका पदुकोणचा लूक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे ‘बेशरम रंग’ हे गाणे १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे पोस्टर रिलीज करताना दीपिका पदुकोणचा बोल्ड लूक रिव्हील करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये दीपिका पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ला रिलीज होणार आहे.

Sat, 10 Dec 202209:14 AM IST

Eknath Shinde: सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सुलोचना चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sat, 10 Dec 202207:56 AM IST

IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनने झळकावले वनडे कारकिर्दीतील पहिले शतक

भारत बांगलादेश सामना यांच्यातील तिसरा वनडे चितगाव येथे सुरू आहे. या सामन्यात इशान किशनने शतक झळकावले आहे. इशानचे हे पहिलेच वनडे शतक आहे. त्याने करिअरच्या ९व्या सामन्यात पहिले शतक झळकावले आहे. त्याने ८५ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. त्याने आतापर्यंत १५ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. या खेळीमुळे भारतीय संघाने २४ षटकात १ बाद १६२ धावा केल्या आहेत. विराट आणि इशान क्रीझवर आहेत.

IND vs BAN 3rd ODI
IND vs BAN 3rd ODI

Sat, 10 Dec 202206:53 AM IST

Sulochana Chavan : लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळानं निधन

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. केंद्र सरकारनं ‘पद्मश्री’ देऊन सुलोचना चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला होता.  

Sat, 10 Dec 202206:29 AM IST

Jayant Patil: भाजपचे लोक जाणूनबुजून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत - जयंत पाटील

राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान करणे अत्यंत चुकीचे तर आहेच, पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला 'भीक' मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Sat, 10 Dec 202206:07 AM IST

Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी १३ डिसेंबरला; कोर्टाकडून प्रकरण बोर्डावर लिस्ट

maharashtra political crisis : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता येत्या १३ डिसेंबरला होणार असल्याचं निश्चित झालं आहे. सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्तासंर्षांसंबंधितील सर्व खटल्यांवर १३ डिंसेबरला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या सुनावणीवर शिवसेना पक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारचं भविष्य अवलंबून असणार आहे.

Sat, 10 Dec 202203:33 AM IST

Walking Plaza In Pune : पुण्यातील लक्ष्मी रोडवर वॉकिंग प्लाझा; रविवारी वाहतूक राहणार बंद

Walking Plaza On Laxmi Road Pune : पुण्यातील नेहमीच गर्दीचा आणि वर्दळीचा भाग असणाऱ्या लक्ष्मी रोडवर दर रविवारी वॉकिंग प्लाझा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रोडवरील वाहतूक संपूर्णत: बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेनं दिली आहे.

Sat, 10 Dec 202202:07 AM IST

MahaRojgar Melava : मुंबईत आज महारोजगार मेळावा; साडेआठ हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या

Mumbai MahaRojgar Melava : महाराष्ट्र शासनाच्या रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आज मुंबईत महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील बेरोजगार असलेल्या तरुणांना कौशल्याधारीत उपक्रमांमध्ये थेट मुलाखतीच्या आधारे नोकरी दिली जाणार आहे. या मेळाव्यात अनेक नामवंत कंपन्या सहभागी होणार असून जवळपास साडेआठ हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती विभागानं दिली आहे.

Sat, 10 Dec 202202:04 AM IST

Nanded Earthquake : नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Earthquake In Nanded : नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भूकंपाची तिव्रता तीन रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त नाही.