Weather News: महाराष्ट्रातील तापमानात (Maharashtra Temperature Today) गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. तर, कुठे उष्णतेच्या लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. याच पाश्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar) नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) येत्या २४ तासांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेचा पारा वाढला आहे. वर्ध्यात सर्वाधिक तापमानाची (४२.५ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली. तर, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. याशिवाय, देशात सध्या मध्य प्रदेशपासून कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, परिणामस्वरुप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांणध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव या भागात जवळपास पाचशे हेक्टरवरील उन्हाळी तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतीचे कामे रखडली आहे. अनेक भागात झाडे उन्मळून पडली असून वाहतूक ठप्प झाली.
भारतीय हवामान विभागाने मे महिन्यासाठीचे हवामान आणि पावसाचे पूर्वानुमान जारी केले. त्यानुसार, मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागात वैशाख वणव्याची जाणीव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असू शकतील. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या