Weather News: मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांत पुढील काही दिवस उष्णता वाढणार असून नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले. जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची (४२.७ अंश सेल्सिअस) नोंद झाली. या व्यतिरिक्त चंद्रपूर (४२.६ अंश सेल्सिअस), वाशीम (४२.६ अंश सेल्सिअस), जेऊर ४२.५ (अंश सेल्सिअस), धुळे (४२.० अंश सेल्सिअस), मालेगाव (४२ अंश सेल्सिअस), अकोला (अंश ४२ सेल्सिअस) आणि वर्ध्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, नाशिक येथे २१.६ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होते.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आजपासून पुढील तीन दिवस उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. तर, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाने आजपासून (२७ एप्रिल २०२४) ते २९ एप्रिल २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे (३९.४ अंश सेल्सिअस), धुळे (४२.० अंश सेल्सिअस), जळगाव (४२.७ अंश सेल्सिअस), जेऊर (४२.५ अंश सेल्सिअस), कोल्हापूर (३६.९ अंश सेल्सिअस), महाबळेश्वर (३०.९ अंश सेल्सिअस), मालेगाव (४२.० अंश सेल्सिअस), नाशिक (३९.८ अंश सेल्सिअस), निफाड (३९.० अंश सेल्सिअस), सांगली (३८.४ अंश सेल्सिअस), सातारा (३८.० अंश सेल्सिअस), सोलापूर (४१.१ अंश सेल्सिअस) , सांताक्रूझ (३४.९ अंश सेल्सिअस), डहाणू (३३.३ अंश सेल्सिअस) आणि रत्नागिरी येथे ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.