मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Iqbal Singh Chahal : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी इक्बालसिंह चहल यांना ईडीचं समन्स

Iqbal Singh Chahal : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी इक्बालसिंह चहल यांना ईडीचं समन्स

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 09:47 PM IST

Iqbal Singh Chahal ED Inquiry : कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस जारी केली आहे.

Enforcement Directorate Summons to Iqbal Singh Chahal
Enforcement Directorate Summons to Iqbal Singh Chahal (HT)

Enforcement Directorate Summons to Iqbal Singh Chahal : कोरोनाकाळात मुंबईत अनेक ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना समन्स जारी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कॅगमार्फत चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला होता. याशिवाय वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता पालिका आयुक्त चहल यांना ईडीनं नोटीस जारी असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

कोरोनाकाळात मुंबईत अनेक ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेकडून जम्बो कोविड केयर सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी अनेक कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. त्यातील लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला कोणताही अनुभव नसतानाही काम देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याशिवाय कंपन्यांनी बनावट कागदपत्रं सादर करत कंत्राट लाटलं असून त्याला आयुक्तांनी परवानगी दिलीच कशी?, असाही सवाल भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीकडून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांच्या नावावर असल्याचाही आरोप करण्यात आला होता. या कंपनीकडे आवश्यक असलेला स्टाफ नसून एमडी डॉक्टरांच्या जागांवर ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमण्यात आल्यानं कंत्राटातील अटी आणि शर्तींचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पीएमआरडीएनं कंपनीचं कंत्राट रद्द करून २५ लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त केली होती. याशिवाय केवळ पुण्यातच नाही तर मुंबईतही या वादग्रस्त कंपनीला कंत्राट देण्यात आल्यामुळं त्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आता ईडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना तपास यंत्रणेनं चौकशीसाठी बोलावलं आहे.

IPL_Entry_Point