मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs RR : राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव, शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारची अप्रतिम गोलंदाजी

SRH Vs RR : राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव, शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारची अप्रतिम गोलंदाजी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 02, 2024 06:43 PM IST

SRH Vs RR IPL : आयपीएल २०२४ मध्ये आज हैदराबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.

SRH vs RR Indian Premier League 2024
SRH vs RR Indian Premier League 2024 (ANI )

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५० वा सामना आज (२ मे) हैदराबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.

ट्रेंडिंग न्यूज

भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. 

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना नितीश रेड्डीच्या नाबाद ७६ धावा आणि ट्रॅव्हिस हेडच्या ५८ धावांच्या जोरावर २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीपासून सावरलेल्या राजस्थानला रियान परागच्या ७७ धावा आणि यशस्वी जैस्वालच्या ६७ धावांच्या जोरावर २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावाच करता आल्या.

हैदराबाद आणि राजस्थान क्रिकेट स्कोअर

६ चेंडूत १३ धावांची गरज

१९ व्या षटकात पॅट कमिन्सने ध्रुव जुरेलला बाद केले आणि त्यानंतर त्याने रॉवमन पॉवेलला ३ डॉट बॉल टाकले. मात्र, पॉवेलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. आता राजस्थानला विजयासाठी ६ चेंडूत १३ धावा करायच्या आहेत. रॉयल्सची धावसंख्या ६ विकेटवर १८९ धावा आहे.

रियान परागचे अर्धशतक

यशस्वी जैस्वालनंतर रियान परागनेही अर्धशतक पूर्ण केले आहे. दरम्यान, दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. राजस्थानने ११ षटकांत २ बाद १११ धावा केल्या आहेत. राजस्थानला आता विजयासाठी ५४ चेंडूत ९१ धावांची गरज आहे.

यशस्वी जैस्वालचे अर्धशतक

जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत यशस्वीने राजस्थानचा डाव केवळ सांभाळला नाही तर अर्धशतकही झळकावले. रियान परागही त्याला चांगली साथ देत आहे जो त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे.

राजस्थानला दुहेरी धक्का

भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात राजस्थानला दुहेरी धक्का दिला. जोस बटलरला बाद केल्यानंतर त्याने कर्णधार संजू सॅमसनलाही बोल्ड केले. तीन चेंडू खेळूनही सॅमसन शुन्यावर बाद झाला. आता रियान पराग क्रीझवर आला आहे. त्यांच्यासमवेत यशस्वी जैस्वाल आहे.

जोस बटलर पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला जोस बटलर पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता कर्णधार संजू सॅमसन क्रीझवर आला आहे.

हैदराबादच्या २०१ धावा

हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ३ बाद २०१ धावांचा डोंगर उभारला आहे. राजस्थानला विजयासाठी २०२ धावा करायच्या आहेत.

हैदराबादकडून नितीश रेड्डीने ४२ चेंडूंत ३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या.

हैदराबादने ३५ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी ५७ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली.

शेवटी हेनरिक क्लासेनने १९ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज आवेश खानने २ बळी घेतले.

नितीश रेड्डी आणि क्लासेनची शानदार फलंदाजी

नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी शानदार फलंदाजी करत हैदराबादला चांगल्या स्थितीत नेले आहे. हैदराबादने १८ षटकांत ३ बाद १७४ धावा केल्या आहेत. रेड्डी ४० चेंडूत ७४ धावांवर तर क्लासेन ९ चेंडूत १७ धावांवर खेळत आहे.

नितीश रेड्डीचे अर्धशतक

नितीश रेड्डीने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. नितीशने राजस्थानविरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

ट्रॅव्हिस हेड बाद

वेगवान गोलंदाज आवेश खानने ट्रॅव्हिस हेडला बोल्ड करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. हेड ४४ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. आता हेनरिक क्लासेन क्रीझवर आला असून नितीश रेड्डी त्याच्यासोबत आहे. हैदराबादने १५ षटकं संपल्यानंतर ३ बाद १३१ धावा केल्या आहेत.

ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक

ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सविरुद्ध या मोसमातील चौथे अर्धशतक झळकावले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हैदराबादने १२ षटक संपल्यानंतर २ बाद ९२ धावा केल्या आहेत. तिसऱ्या विकेटसाठी हेड आणि नितीश रेड्डी यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.

हैदराबादला दुसरा धक्का

वेगवान गोलंदाज संदीप शर्माने अनमोलप्रीत सिंगला बाद करत राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. अनमोलप्रीत ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. तथापि, ट्रॅव्हिस हेड क्रीजवर आहे आणि नितीश रेड्डी त्याला साथ देण्यासाठी आला आहे.

हैदराबादला पहिला धक्का

आवेश खानने सनरायझर्स हैदराबादला ५व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पहिला धक्का दिला. अभिषेक शर्मा १० चेंडूत एका षटकारासह १२ धावा करून बाद झाला. लेग साइड बाऊंड्रीवर ध्रुव जुरेलने त्याला झेलबाद केले. हैदराबादने २५ धावांत पहिली विकेट गमावली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट सब्स: जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, तनुष कोटियन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद सब्स: उमरान मलिक, मयंक मार्कंडे, एडन मार्कराम, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट

हैदराबादने टॉस जिंकला

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीच रिपोर्ट

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकुल आहे. इथे २०० पेक्षा जास्त धावा सहज होतात. येथे गोलंदाजीत फिरकीपटू नक्कीच काही प्रभाव दाखवू शकतात. बाकी वेगवान गोलंदाजांसाठी इथे फार काही नाही. सामना सुरू झाल्यानंतर वेगवान गोलंदाजांना काही वेळ मदत मिळेल. नंतर येथे धावांचा पाऊस पडतो.

हैदराबाद वि. राजस्थान हेड टू हेड

आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले आहेत. यापैकी ९ सामने राजस्थानने आणि ९ सामने हैदराबादने जिंकले आहेत. दोन्ही संघ एकेकाळचे आयपीएल चॅम्पियन आहेत. राजस्थानने २००८ मध्ये आयपीएल जिंकले होते, तर हैदराबादने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. दोन्ही संघांमधील गेल्या ५ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने ३ आणि हैदराबादने २ जिंकले आहेत

IPL_Entry_Point