आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियासह अनेकांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. पण अद्याप पाकिस्तानने आपला वर्ल्डकप संघ जाहीर झालेला नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी T20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा पुढे ढकलली आहे. पीसीबीने सांगितले की, काही खेळाडू फिटनेसच्या समस्यांशी झुंजत आहेत, त्यामुळे संघाची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.
ICC ने T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना १५ सदस्यांची घोषणा करण्यासाठी १ मे ही अंतिम मुदत दिली होती. २५ मे पर्यंत संघ जाहीर केलेल्या संघांमध्ये बदल करू शकतात. या बदलासाठी ICC किंवा विश्वचषक तांत्रिक समितीची परवानगी घेण्याची गरज नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान २३ किंवा २४ मे रोजी टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करेल. मॅनेजमेंट आणि निवडकर्ते मोहम्मद रिझवान, आझम खान, इरफान खान नियाझी आणि हॅरिस रौफ यांच्या दुखापतींबद्दल चिंतेत आहेत आणि ते आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्या फिटनेसची चाचणी घेतील.
सूत्राने सांगितले की, “संघ निवडीतील विलंबाने काही फरक पडत नाही कारण सर्व संघ २४ मे पर्यंत बदल करू शकतात. यानंतर जे बदल केले जातील ते फिटनेस किंवा दुखापतीच्या आधारावर असतील आणि त्यासाठी तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागेल. यामुळेच पीसीबी आणि निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापर्यंत संघ जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ओमान आणि कॅनडा यांनी त्यांच्या वर्ल्डकप संघांची घोषणा केली आहे.