आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची स्थिती सध्या चांगली दिसत नाही. सीएसकेने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
पण आता पाचवेळच्या चॅम्पियन सीएसके संघासाठी पुढचा रस्ता कठीण दिसत आहे. कारण त्यांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत तर काही आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी मायदेशी परतले आहेत.
दीपक चहर नुकताच पंजाब किंग्जविरुद्ध २ चेंडू टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्याचा फिटनेस नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.
IPL २०२४ मध्ये दीपक चहरचा फॉर्म फारसा चांगला राहिला नाही आणि त्याला आतापर्यंत फक्त ५ विकेट घेता आल्या आहेत. हॅमस्ट्रिंगची दुखापत त्याला बऱ्याच दिवसांपासून सतावत आहे. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध २ चेंडू टाकले, त्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी परतला नाही.
सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अलीकडेच म्हटले की, चहरची दुखापत गंभीर असू शकते. चेन्नई सुपर किंग्जला तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, महिश तिक्षाना आणि मथिशा पाथिराना यांच्या रुपातही धक्का बसू शकतो.
स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, की "दीपक चहरची प्रकृती ठीक नाही, तरीही आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्टची अपेक्षा आहे. फिजिओ आणि डॉक्टर लवकरच त्याची तपासणी करतील. तर श्रीलंकेचे खेळाडू व्हिसामुळे मायदेशी परतले आहेत. आम्हाला आशा आहे की त्यांना कोणतीही अडचण येणार नाही."
तुषार देशपांडे याला फ्लू झाला होता, त्यामुळे तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. बांगलादेश ३ मेपासून झिम्बाब्वेसोबत टी-20 मालिका सुरू करणार आहे. त्यामुळे मुस्तफिजुर रहमान आता CSK संघाचा भाग असणार नाही.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातून महिष थीक्षाना आणि मथिशा पाथिरानाही गायब होते. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यामुळे ते श्रीलंकेत परतले आहेत. व्हिसा मिळताच हे दोन्ही खेळाडू पुन्हा संघाचा भाग बनतील आणि धर्मशाला येथे होणाऱ्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दोन्ही खेळाडू पुनरागमन करू शकतील, अशी आशा प्रशिक्षकाने व्यक्त केली आहे.