शरद पवारांनी सांगितलं तर कोरड्या विहिरीत उडी मारेन; शिवसैनिक राहिलेल्या आमदाराचं वक्तव्य
Nilesh Lanke praises Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या संपर्कात आलो असतो तर यापूर्वीच आमदार झालो असतो, असाही गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्यानं केला आहे.
NCP MLA Nilesh Lanke On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील परिस आहेत. यापूर्वीच त्यांच्या संपर्कात आलो असतो तर केव्हाच आमदार झालो असतो. आता त्यांनी सांगितलं तर कोरड्या विहिरीत उडी मारायलाही मागे पुढे पाहणार नाही, असं वक्तव्य पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. निलेश लंके हे पूर्वी शिवसेनेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे दिग्गज नेते विजय औटी यांचा पराभव करत निलेश लंके आमदार झाले होते. त्यानंतर आता त्यांनी भावनिक वक्तव्य करत राष्ट्रवादीशी निष्ठा जाहीरपणे व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आमदार निलेश लंके यांच्या पारनेरमधील निवास्थानी भेट दिली. त्यावेळी लंके बोलताना म्हणाले की, आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षात माझा पवार कुटुंबियाशी अत्यंत जवळचा संबंध आला. राष्ट्रवादीत प्रवेश करून मी आमदार झालो, त्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नेहमीच विकासकामांसाठी मदत केली. त्यामुळं आता पवारांनी सागितलं तर कोरड्या विहिरीत उडी मारेन, असं म्हणत त्यांनी पक्षाशी निष्ठा व्यक्त केली आहे. आमदार झाल्यानंतरही मी लोकांची सेवा करत आहे. शिवरायांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करत असून लोकांकडूनही भरपूर प्रेम मिळत असल्याची भावना आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
एका प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही दिल्लीत राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी संरक्षणमंत्री पवारांचं स्वागत करण्यासाठी आणि वाहनापर्यंत सोडवण्यासाठी ऑफिसमधून बाहेर आल्याचा किस्सा सांगत आमदार लंकेंनी पवारांची ताकद दिल्लीत गेल्यानंतर समजते, असंही म्हटलं आहे. पारनेरमध्ये राजकारण करण्याची मर्यादा ठरवून घेतली असून अनेक लोकांच्या समस्या मार्गी लावणार असल्याचं आश्वासन लंकेंनी उपस्थितांना दिलं आहे.