मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Latur Crime News : तीन हजारांसाठी लातूरमध्ये दलित तरुणाची हत्या, धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ

Latur Crime News : तीन हजारांसाठी लातूरमध्ये दलित तरुणाची हत्या, धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 10:46 AM IST

Latur Murder Case : नांदेडमधील हत्येची घटना ताजी असतानाच आता लातूरमध्ये किरकोळ वादातून दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Latur Crime News Marathi
Latur Crime News Marathi (HT_PRINT)

Latur Crime News Marathi : वरातीत आल्याच्या कारणावरून नांदेडच्या बोंढार गावात जातीयवाद्यांनी अक्षय भालेराव या तरुणाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांच्या वसूलीसाठी आणखी एका दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लातूरमधील रेणापूरमध्ये ही संतापजनक घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. गिरिधारी केशव तपघाले असं आरोपींकडून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या रेणापुरमध्ये राहणाऱ्या गिरीधारी तपघाले यांनी काही दिवसांपूर्वी गावातील एका सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचा व्याज वाढत असल्यामुळं आरोपी लक्ष्मण मार्कड आणि प्रशांत वाघमोडे यांनी गिरीधारी यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. पैशांच्या कारणावरून आरोपींनी गिरीधारी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु त्यानंतरही पैशांची वसूली न झाल्याने संतापलेल्या लक्ष्मण आणि प्रशांत यांनी गिरीधारी यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी गिरीधारी यांच्या डोक्यात लोखंडी सळई आणि लाकडी दांड्याने वार केले. याशिवाय भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांनाही आरोपींनी मारहाण केली.

आरोपींच्या मारहाणीत जखमी झालेल्या गिरीधारी यांना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. कमल तपघाले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दिपक शिंदे आणि पोलिस कर्मचारी अभिजित थोरात हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

IPL_Entry_Point