मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Kalate : बंडखोर राहुल कलाटेंनी दिली चिंचवडच्या निवडणुकीला कलाटणी; मतांची आकडेवारी बघाच!

Rahul Kalate : बंडखोर राहुल कलाटेंनी दिली चिंचवडच्या निवडणुकीला कलाटणी; मतांची आकडेवारी बघाच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 03, 2023 11:35 AM IST

Rahul Kalate shocks Maha Vikas Aghadi in Pune Bypoll : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचं गणित बिघडलं आहे. राहुल कलाटे यांची बंडखोरी त्यासाठी कारणीभूत ठरली आहे.

Nana Kate - Rahul Kalate
Nana Kate - Rahul Kalate

Rahul Kalate in Chinchwad Vidhan Sabha Bypoll : पुण्यातील कसबा व चिंचवड विधासनभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी बाजी मारली आहे. कसब्यात भाजपला धक्का देणाऱ्या महाविकास आघाडीला चिंचवडमध्ये तसं यश मिळवता आलं नाही. यामागे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोर राहुल कलाटे हे कारणीभूत ठरले आहेत. त्यांना मिळालेली भरघोस मतं आघाडीच्या विजयाचं गणित बिघडवणारी ठरली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपनं प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. त्यांनी तब्बल ११ हजारांहून अधिक मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला. मात्र, चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीचे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते राहुल कलाटे हे उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, महाविकास आघाडी असल्यानं शिवसेनेचा नाइलाज होता. परिणामी कलाटे यांनी इथून बंडखोरी करून निवडणूक लढवली. चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे गटनेते असलेले कलाटे हे मतदारांना परिचित होते. तब्बल ६१ कोटींची संपत्ती असलेले कलाटे हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवार होते. त्यामुळं त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार हे सुरुवातीपासूनच बोललं जात होतं.

त्यातच वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांच्यासाठी सभा घेत त्यांना ताकद दिली होती. त्याचा परिणाम निकालात दिसला. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, अपक्ष राहुल कलाटे यांनी या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मतं मिळाली तर, राहुल कलाटे यांनी तब्बल ४४,११२ मतं खेचली. अश्विनी जगताप व नाना काटे यांच्या मतांमधील फरक ३६ हजार इतकं आहे. कलाटे यांची बंडखोरी हेच या फरकाचं कारण ठरलं आहे.

IPL_Entry_Point