Chandrapur Majari Food Poisoning news : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जवळील माजरी येथे एका धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादातुंन १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती ही गंभीर आहे. विषबाधा झालेल्यामध्ये ६ पुरुष, ३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
सध्या देवीचे नवरात्र सुरू असून या निमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील कालीमाता मंदिरात शनिवारी (दि १३) रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील धार्मिक कार्यक्रमात आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक माजरी येथे आले होते.
महाप्रसादात वरण-भात, भाजी, पोळी व बुंदी हे पदार्थ होते. महाप्रसादाचे जेवण जेवल्यावर काही वेळातच नागरिकांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. मोठ्या प्रमाणात नागरिक अचानक आजारी पडल्याने मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. महाप्रसादातील केवळ बुंदी खाणाऱ्यांनाही विषबाधा झाल्याने ही विषबाधा बुंदीतूनच झाली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे.
आजारी नागरिकांना तातडीने माजरी येथील वेकोली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, माजरीत रुग्णालयात कमी बेड असल्याने त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, माजरीच्या दवाखान्यात सलाईनचाही साठा अपुरा असल्याने पुढे आले. येथील काही आजारी नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्याची नामुष्की रुग्णालय प्रशासनावर आली. विषबाधा झालेले नागरिक रात्री १.३० वाजता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात स्वत:च्या खर्चाने गेले. रुग्णांना वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती. दरम्यान, वरोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांनी याची दखल घेत आजारी नागरीकांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या.
उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६९ विषबाधाग्रस्तांपैकी ६ जणांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या गुरुफेन यादव (वय ८०) या वृद्ध रुग्णाचा मृत झाला. तर, चंद्रपूर येथे हालविण्यात आलेल्या रुग्णात आर्यन राजपुता (५ वर्ष), अभिषेक वर्मा (५ वर्ष), आशय राम (३ वर्ष), सोमय्या कुमार (दीड वर्ष), देवांश राम (अडीच वर्ष), गुरु फेन यादव (वय ८०) या सहा जणांचा समावेश आहे. माजरी येथे प्राथमिक उपचार केंद्रात १० जण, वेकोलीच्या रुग्णालयात २५ ते ३० जण दाखल आहे. यातील काही जणांना चंद्रपूर व वणी येथे हलवण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाणेया विषबाधा झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतीक बोरकर यांनी दवाखान्यात भेट देऊन रुग्णांची भेट घेत त्यांची चौकशी केली. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या