मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll : गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार?, भाजपकडून ही पाच नावं चर्चेत!

Pune Bypoll : गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार?, भाजपकडून ही पाच नावं चर्चेत!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 01, 2023 08:19 PM IST

Pune Bypoll : भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

Pune Lok Sabha Bypoll
Pune Lok Sabha Bypoll (HT)

Pune Lok Sabha Bypoll : भाजपाचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाहून जास्त कालावधी उरलेला असल्यामुळं निवडणूक आयोगाकडून पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या काही दिवसांतच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आता गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या पाच नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत. त्यामुळं आता गिरीश बापटांची पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पुण्याच्या रिंगणात कुणाला उतरवणार?, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपकडून कोणती नावं चर्चेत?

पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून गिरीश बापटांची सून स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहे. भाजपच्या दुसऱ्या फळीतील या पाच नेत्यांपैकी भाजप कुणाला उमेदवारी देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय कसबा पोटनिवडणुकी प्रमाणेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपसमोर उमेदवार निवडीचं मोठं आव्हान असणार आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत. बापटांच्या घरातील व्यक्तीला भाजपनं तिकीट दिलं तर पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु बापट कुटुंबियांशिवाय इतर दुसऱ्या नेत्याला भाजपनं रिंगणात उतरवलं तर पुण्यात पोटनिवडणूक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून कोणत्या नावांची चर्चा?

पुणे लोकसभा मतदारसंघ ही पारंपारिकरित्या काँग्रेसची जागा राहिलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापटांविरोधात काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळं आता पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रमेश बागवे यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु सर्व काही भाजपच्या उमेदवारीवर अवलंबून असणार आहे. भाजपनं बापटांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही तर महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

IPL_Entry_Point