Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांची जेलमधून सुटका, शिक्षेच्या ४८ दिवसांआधीच तुरुंगाबाहेर
Navjot Singh Sidhu : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे गेल्या १० महिन्यांपासून तुरुंगात होते. शिक्षा पूर्ण होण्याच्या ४८ दिवसांआधीच त्यांची सुटका करण्यात आली आहे.
Navjot Singh Sidhu Released : पंजाबमध्ये प्रचंड गाजलेल्या रोड रेज प्रकरणात गेल्या १० महिन्यांपासून पटियालाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू यांची आज तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु शिक्षा पूर्ण होण्याच्या ४८ दिवसांपूर्वीच त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं आहे. सिद्धू बाहेर येत असताना कारागृहाच्या परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. नवज्योतसिंग सिद्धू हे तुरुंगाच्या बाहेर येणार असल्याची माहिती यापूर्वी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.
ट्रेंडिंग न्यूज
१९८८ सालच्या रोड रेज केसमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा झाली होती. नियमानुसार त्यांना १८ मे रोजी सोडण्यात येणार होतं. परंतु कारागृहातील चांगल्या वागणुकीमुळं त्यांना ४८ दिवसांपूर्वीच सोडण्यात आलं आहे. रोड रेज प्रकरणात २०२२ मध्ये सिद्धू यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यामुळं आता नवज्योतसिंग सिद्धू हे तुरुंगातून बाहेर आल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
२७ डिसेंबर १९८८ रोजी नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांच्या मित्रांबरोबर पटियालाच्या शेरावले बाजारात गेले होते. त्यावेळी कारच्या पार्किंगवरून झालेल्या वादातून सिद्धू यांनी गुरनाम सिंग नावाच्या व्यक्तीला मारहाण केली होती. हाणामारीत जमीनीवर पडल्यानं गुरनाम सिंग यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात ट्रायल कोर्टानं सिद्धू यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सिद्धू यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द ठरवत सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.
सिद्धूंना काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी मिळणार?
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. तात्कालीन मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना आपच्या उमेदवारांनी धूळ चारली होती. त्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगाबाहेर आल्यानंतर काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांकडून पक्षसंघटना नव्यानं बांधण्याची जबाबदारी नवज्योतसिंह सिद्धू यांच्याकडे देणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेमध्येही स्थान दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.