Bhalchandra Nemade On Aurangzeb : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात औरंगजेब, ब्राह्मण आणि पेशव्यांवर उघडपणे भाष्य केलं आहे. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. दुसऱ्या बाजीरावाने महाराष्ट्र इंग्रजांच्या हातात सोपवला आणि औरंगजेबच्या हिंदू राण्यांना हिंदू पंडितांनी भ्रष्ट केलं, असे वक्तव्य नेमाडे यांनी केले आहे. त्यानंतर आता भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच नेमाडे यांच्यावर ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा नेते आशुतोष दुबे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भालचंद्र नेमाडे यांनी ब्राह्मणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणात हस्तक्षेप करणारं आणि लोकांना चिथावणी देणारं भाषण केल्याचा आरोप करत दुबे यांनी केला आहे. ठाण्यातील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये दुबे यांनी नेमाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं आता भालचंद्र नेमाडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपच्या अनेक नेत्यांनी नेमाडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमाडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना लेखक भालचंद्र नेमाडे म्हणाले की, औरंगजेबाला दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशीला गेलेल्या असताना हिंदू पंडितांनी त्यांचं अपहरण करून त्यांना भ्रष्ट केलं. हिंदू राण्या गायब झाल्याचं समजल्यानंतर औरंगजेबाला त्यांच्यासोबत जे झालं त्याची माहिती मिळाली. त्यानंतर औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं. याशिवाय पेशव्यांच्या दुसऱ्या बाजीरावाने महाराष्ट्र इंग्रजांच्या हातात सोपवल्याचंही वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या