‘संजय राऊतांनी औकातीत राहावं, तुकड्यावर जगणाऱ्यांनी जास्त बोलू नये’, आशिष शेलारांचं वक्तव्य
Ashish Shelar : शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यानंतर आता भाजपनं त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Ashish Shelar On Sanjay Raut : निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यानंतर आता राऊतांच्या आरोपांना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊतांनी औकातीपेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही, त्यांनी त्यांच्या औकातीतच राहायला हवं. त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा जिंकलेली नाही. कुणी तरी फेकलेल्या तुकड्यावर त्यांचं घर चालतं. त्यामुळं त्यांनी बोलताना विचार करून बोलायला हवं, असं म्हणत आशिष शेलार यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.
संजय राऊतांनी एकही निवडणूक लढवलेली नाही आणि आता ते भाजप-शिंदे गटावर टीका करत आहेत, सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, त्यामुळंच एकनाथ शिंदे यांच्यामुळं उद्धव ठाकरेंना सत्ता सोडावी लागली होती. संजय राऊत निवडणूक आयोगाबाबत जे दावे आता करत आहेत किंवा ज्या पद्धतीनं आमच्यावर टीका करत आहेत, त्यांनी ते न्यायालयात सांगायला हवं, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.