मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah In Pune: पुण्यातील शिवसृष्टीचं अमित शहांच्या हस्ते लोकार्पण, शिवरायांबाबत बोलताना म्हणाले…

Amit Shah In Pune: पुण्यातील शिवसृष्टीचं अमित शहांच्या हस्ते लोकार्पण, शिवरायांबाबत बोलताना म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 04:32 PM IST

Amit Shah In Ambegaon Pune : छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा आज आपल्या घराबाहेरपर्यंत असती, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

Home Minister Amit Shah Pune Visit
Home Minister Amit Shah Pune Visit (HT)

Home Minister Amit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुण्याच्या आंबेगावातील शिवसृष्टीचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी साकारण्यात आली असून त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची सीमा आपल्या घराबाहेर असती, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थितांशी बोलताना म्हटलं आहे.

शिवसृष्टीचं लोकार्पण केल्यानंतर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, शिवसृष्टी हा आशियातील सर्वात मोठा आणि भव्यदिव्य असा थीम पार्क प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या किल्ल्यांची थ्रीडीद्वारे सफर घडवून आणण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि त्यांच्या काळातील अनेक लढायांचं चित्रण आपल्याला शिवसृष्टीमार्फत अनुभवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज काय झाले असते याची कल्पनाही आपण करू शकत नाही, असंही शहा म्हणाले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकदा म्हटलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला आपल्या घराबाहेरच पाकिस्तानची सीमा पाहायला मिळाली असती. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांना घराघरात पोहचवण्याचं काम केलं, केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमधील आठ जिल्ह्यांत बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांनी देशावर फार मोठे उपकार केले असून त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं माझ्या हस्ते लोकार्पण झाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असंही अमित शहा म्हणाले.

शिवरायांचा आदर्श ठेऊनच राज्यकारभार- मुख्यमंत्री

पुण्यातील शिवसृष्टीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शिवसृष्टीचं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण होणं ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊनच आम्ही राज्यकारभार करत असून शिवसृष्टीचं उर्वरित कामही लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

IPL_Entry_Point