मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS AUS 2nd Test : भारताने दिल्ली जिंकली, आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं फायनल खेळणार

IND VS AUS 2nd Test : भारताने दिल्ली जिंकली, आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं फायनल खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 19, 2023 02:26 PM IST

India vs Australia (IND vs AUS) 2nd Test Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

IND VS AUS 2nd Test
IND VS AUS 2nd Test

भारतीय संघाने दिल्ली कसोटी ६ गडी राखून जिंकली आहे. टॉड मर्फीच्या चेंडूवर चौकार मारून चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने २६२ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांवर गारद झाला. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी भारताला ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. टीम इंडियाने तिसर्‍याच दिवशी ४ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिला तर केएस भरतही २३ धावा करून नाबात राहिला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

या विजयासह भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. आता भारताला उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजयाची गरज असून टीम इंडिया जूनमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे.

सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २६३ धावा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फलंदाजी करत २६३ धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या गाठता आली. तर पहिल्या डावात भारताकडून शमीने ४ आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी ३ बळी घेतले.

अक्षर-अश्विनने भारताला वाचवलं

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने अत्यंत खराब सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याचे दिसत होते, मात्र अश्विन-अक्षरने शतकी भागीदारी करत भारताला सामन्यात परत आणले. दोघांनी आठव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या एका धावेची आघाडी मिळाली.

 भारताकडून अक्षरने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर विराट कोहली आणि अश्विननेही उपयुक्त खेळी खेळली. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने ५ विकेट घेतल्या. मर्फी-कुहमन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली होती. एका टप्प्यावर ऑस्ट्रेलिया ६५ धावांवर एक विकेट गमावून चांगल्या स्थितीत दिसत होता. परंतु तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ ११३ धावांवर बाद. पहिल्या डावातील एक धावेच्या आघाडीच्या जोरावर भारताला ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. 

हे लक्ष्य  टीम इंडियाने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पुढचा सामना जिंकताच भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

WhatsApp channel