मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Jayanti : ‘शिवनेरीवर शिवभक्तांना प्रवेश द्या अन्यथा...’, संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

Shiv Jayanti : ‘शिवनेरीवर शिवभक्तांना प्रवेश द्या अन्यथा...’, संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 04:05 PM IST

Shiv Jayanti Shivneri : शिवनेरीवर शिवभक्तांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर संभाजीराजेंनी थेट भूमिका घेत सरकारला सुनावलं आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji Raje (HT)

Chhatrapati Sambhaji Raje : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात असतानाच आता शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांना प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. परंतु या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी शिवभक्तांना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत शिवनेरीवर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे आज शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती साजरी केली जात असताना कार्यक्रमात शिवभक्तांना प्रवेश दिला जात नाहीये. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी 'जोपर्यंत शिवभक्तांना शिवनेरीवर प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत शिवनेरीवर जाणार नसल्याची' भूमिका घेतली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी संभाजीराजे यांनी शिवजयंतीच्या नियोजनावरून नाराजी व्यक्त करत शिवनेरीवर न जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचा शासकीय सोहळ्यावर बहिष्कार...

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज उभारण्यास शिंदे-फडणवीस सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवरील शासकीय शिवजयंती कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावरून निघून गेल्यानंतर आम्ही दर्शनासाठी शिवनेरीवर जाणार असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point