मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : शिवसेनेचं नाव आणि चिन्हावरील संघर्षावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar : शिवसेनेचं नाव आणि चिन्हावरील संघर्षावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 05:14 PM IST

Sharad Pawar Live Today : निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत.

Sharad Pawar On Uddhav Thackeray
Sharad Pawar On Uddhav Thackeray (HT)

Sharad Pawar On Uddhav Thackeray : शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. त्यानंतर आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनीही ठाकरे गटाच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण यावरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादात आपण पडणार नाही. हे मी एकदाच सांगतो आहे, असं थेट वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळं अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पवारांनी या प्रकरणावर थेट प्रतिक्रिया दिल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त पीएम नरेंद्र मोदी यांचे गुलाम झाल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. आयोगानं शिंदे गटाच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर पुण्यातील गांजवे चौकात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. त्यामुळं आता शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे कोणती राजकीय खेळी खेळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

WhatsApp channel