भारतात सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. यंदाची आयपीएल टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाणार आहे.
पण टीम इंडियाच्या निवडीआधी एका दिग्गज व्यक्तीने रोहित शर्माच्या वर्ल्डकप संघातील जागेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) माजी संचालक आणि दिग्गज क्रिकेट समीक्षक जॉय भट्टाचार्य यांचे मत आहे की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी आदर्श पर्याय नाही.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी, रोहित शर्मा हा टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल, हे जाहीर केले होते.
स्पर्धा जवळ येत असताना जॉय भट्टाचार्य यांनी रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्यांच्या मते, रोहितची कर्णधारपदी नियुक्ती केल्याने संघासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जॉय भट्टाचार्य क्रिकबझवर म्हणाले, की'टी-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माला भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय संघासाठी अडचणी निर्माण करू शकतो. या क्षणी, रोहित शर्मा हा T20 फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी आदर्श पर्याय नाही. मी रोहित शर्माचा खूप आदर करतो आणि मला वाटते की तो एक अद्भुत क्रिकेटर आहे. मात्र, तो सध्या फॉर्मात नाही.
विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि सलामीसाठी प्रबळ दावेदार आहेत. शर्मा कर्णधार असल्याने तो सलामीला खेळेल, याचा अर्थ फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंपैकी एकाला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल किंवा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर रहावे लागेल.
सोबतच, जॉय भट्टाचार्य यांना वाटते, की रोहित सध्या फॉर्ममध्ये नाही आणि तो कर्णधार असल्याने, भारताला १५ सदस्यीय विश्वचषक संघातून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल किंवा स्टार फलंदाज विराट कोहली यांना बाहेर काढावे लागेल.
विशेष म्हणजे, भट्टाचार्य यांनी भारताच्या कर्णधारपदासाठी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड केली आहे. भट्टाचार्य यांच्या मते, 'मी रोहित शर्मापेक्षा जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड करेन कारण बुमराहचे गोलंदाज म्हणून कौशल्य त्याला संघाचा महत्त्वाचा सदस्य बनवते."