KKR Vs PBKS : ईडन गार्डनवर बेअरस्टो-शशांक सिंगचं वादळ, पंजाबनं पूर्ण केलं २६२ धावांचं लक्ष्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR Vs PBKS : ईडन गार्डनवर बेअरस्टो-शशांक सिंगचं वादळ, पंजाबनं पूर्ण केलं २६२ धावांचं लक्ष्य

KKR Vs PBKS : ईडन गार्डनवर बेअरस्टो-शशांक सिंगचं वादळ, पंजाबनं पूर्ण केलं २६२ धावांचं लक्ष्य

Apr 26, 2024 11:25 PM IST

kkr vs pbks ipl 2024 score : आयपीएल २०२४ मध्ये आज कोलकाता आणि पंजाब आमनेसामने होते. या सामन्यात पंजाबने २६२ धावांचा यशस्वी पाठलाग करून केकेआरला धुळ चारली.

KKR vs PBKS Indian Premier League
KKR vs PBKS Indian Premier League (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ४२ वा सामना आज (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. 

या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १८.४ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने नाबाद १०८ धावा केल्या. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ९ षटकार मारले. शशांक सिंगने २८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. त्याने ९ षटकार आणि २ चौकार मारले. याआधी प्रभासिमरन सिंगने १९ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी केली. रिले रुसो २६ धावा करून बाद झाला.

कोलकाताकडून फिलिप सॉल्टने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. सुनील नरेनने ३२ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. व्यंकटेश अय्यरने ३९ धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर २८ धावा करून बाद झाला. यादरम्यान पंजाबकडून अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

केकेआर वि. पंजाब क्रिकेट स्कोअर

जॉनी बेअरस्टोचं शतक

जॉनी बेअरस्टोने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. या लीगमध्ये त्याने ५ वर्षांनंतर शतक झळकावले. शेवटच्या वेळी त्याने २०१९ मध्ये शतक केले होते. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघात होता. पंजाबला २४ चेंडूत ५२ धावांची गरज आहे. त्यांनी १६ षटकांत दोन गडी गमावून २१० धावा केल्या आहेत.

जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक

जॉनी बेअरस्टोने २३ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १०वे अर्धशतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. त्याने वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. सध्या बेअरस्टो २८ चेंडूत ५७ धावा तर रिले रुसो १२ चेंडूत १८ धावा करत फलंदाजी करत आहे. १० षटकांनंतर पंजाबची धावसंख्या एका विकेटवर १३२ धावा आहे. पंजाबला आता ६० चेंडूत १३० धावांची गरज आहे.

पंजाब किंग्जची पहिली विकेट पडली

पंजाब किंग्जची पहिली विकेट पडली. प्रभासिमरन २० चेंडूत ५४ धावा करून धावबाद झाला. त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. पंजाबने ६ षटकात ९३ धावा केल्या आहेत.

प्रभसिमरन सिंगने दमदार अर्धशतक झळकावले

पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने दमदार अर्धशतक झळकावले. तो २० चेंडूत ५४ धावा करून खेळत आहे. त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले आहेत. बेअरस्टो १२ ​​धावा करून खेळत आहे. पंजाबने ५ षटकात ६९ धावा केल्या आहेत.

पंजाबची धमाकेदार सुरूवात

पंजाब किंग्जने ४ षटकात बिनबाद ५७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंग १६ चेंडूत ४३ धावा करून खेळत आहे. जॉनी बेअरस्टो ११ धावा करून खेळत आहे. पंजाबला विजयासाठी २०५ धावांची गरज आहे. प्रभसिमरन आणि बेअरस्टो यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली.

केकेआरच्या २६१ धावा

कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जसमोर २६२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताने २० षटकांत ६ गडी गमावून २६१ धावा केल्या. ईडन गार्डन्सवर कोणत्याही संघाची आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने नाइट रायडर्सविरुद्ध २३५ धावा केल्या होत्या.

केकेआरकडून सुनील नरेनने ३२ चेंडूत ७१ धावा केल्या. फिलिप सॉल्टने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. श्रेयस अय्यरने १० चेंडूत २८ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने ३९ धावा केल्या. आंद्रे रसेलने २४ धावा केल्या तर रिंकू सिंग ५ धावा करून बाद झाला. रमणदीप सिंग ६ धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे केकेआरने २० षटकांत ६ गडी गमावून १६१ धावा केल्या.

पंजाबकडून अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

फिल सॉल्ट बाद

कोलकाताला १३व्या षटकात १६३ धावांवर दुसरा धक्का बसला. पहिल्या दोन चेंडूंवर २ षटकार मारल्यानंतर सॅम करनने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सॉल्टला क्लीन बोल्ड केले. सॉल्टने ३७ चेंडूत ७५ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ६षटकार मारले. १३ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा आहे. सध्या आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर क्रीजवर आहेत.

कोलकाताला पहिला धक्का

कोलकाताला ११व्या षटकात १३८ धावांवर पहिला धक्का बसला. राहुल चहरने सुनील नरेनला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. ३२ चेंडूत ७१ धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. सध्या फिल सॉल्ट आणि व्यंकटेश अय्यर क्रीजवर आहेत. ११ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या एका विकेटवर १४४ धावा आहे.

९ षटकात ११८ धावा, सॉल्टचे अर्धशतक

कोलकाताने ९ षटकांनंतर एकही विकेट न गमावता ११८ धावा केल्या आहेत. नरेन २७ चेंडूत ६० धावा तर सॉल्ट २७ चेंडूत ५२ धावा करत फलंदाजी करत आहे. सॉल्टने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक २५ चेंडूत पूर्ण केले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी नरेनने अर्धशतक झळकावले होते. या दोघांनी कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली आहे.

८ षटकात १०५ धावा, नरेनचे अर्धशतक

८ षटकांनंतर कोलकाताने एकही विकेट न गमावता १०५ धावा केल्या आहेत. सध्या फिल सॉल्ट २४ चेंडूत ४६ तर सुनील नरेन २४ चेंडूत ५३ धावा करून फलंदाजी करत आहे. दोघेही आक्रमक फलंदाजी करत आहेत. नरेनचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक आहे.

केकेआरच्या ५ षटकांत ७० धावा

कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या ५ षटकांत ७० धावा केल्या आहेत. सुनील नरेन १४ चेंडूत ३७ धावा करून खेळत आहे. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. सॉल्ट १६ चेंडूत ३० धावा करून खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

पंजाबने टॉस जिंकला

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनही या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी सॅम करन नाणेफेकसाठी आला. करनने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टोचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

त्याचबरोबर कोलकातानेही प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला आहे.

केकेआर वि. पंजाब हेड टू हेड रेकॉर्ड

आतापर्यंत दोन्ही संघ ३२ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरने २१ वेळा, तर पंजाब किंग्जने ११ वेळा विजय मिळवला आहे. अशाप्रकारे, आकडेवारी आणि सध्याचा फॉर्म पाहिल्यास, केकेआर विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

ईडन गार्डन्सची पीच कशी असेल?

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सातत्याने मोठी धावसंख्या उभारली जात आहे. या मोसमात संघांनी अनेकवेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय संघांनी २०० धावांचा पाठलागही केला आहे. त्यामुळे या मैदानावर पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

नाणेफेक जिंकल्यानंतर संघांना प्रथम गोलंदाजी करायला आवडते. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या ९० टी-20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३७ वेळा विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५३ वेळा विजय मिळवला आहे.

Whats_app_banner