इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ४२्व्या सामन्यात पंजाब किंग्जने इतिहास रचला आहे. त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे. पंजाबने अवघ्या १८.४ षटकांत २६२ धावांचे लक्ष्य गाठले. म्हणजे शेवटी ८ चेंडू बाकी होते. २६२ धावा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पाठलाग आहे.
या सामन्यात कोलकाताने पंजाबला विजयासाठी २६२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ८ चेंडू बाकी असताना पूर्ण केले. टी-20 क्रिकेट आणि आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आहे.
पंजाबच्या विजयाचे नायक जॉनी बेअरस्टो, शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग ठरले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ गडी गमावून २६१ धावा केल्या. फिल सॉल्टने ३७ चेंडूत ७५ तर सुनील नरेनने ३२ चेंडूत ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात प्रभासिमरन सिंगने २० चेंडूत ५४ धावांची खेळी करत पंजाबला झंझावाती सुरुवात करून दिली.
यानंतर जॉनी बेअरस्टोने ४८ चेंडूत १०८ धावा आणि शशांक सिंगने २८ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी करत पंजाबला विजयाकडे नेले. या सामन्यात ४१ षटकारांचा पाऊस पडला. जे आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही सामन्यातील सर्वाधिक आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकमेव विकेट सुनील नरेनला मिळाली.
या विजयासह पंजाबचा संघ ९ सामन्यांत ३ विजय आणि ६ पराभवांसह सहा गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ८ सामन्यांत ५ विजय आणि ३ पराभवांसह त्यांचे १० गुण आहेत. पंजाबला पुढील सामना १ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. तर कोलकाताला २९ एप्रिलला दिल्लीविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळायचे आहे.