Yuzvendra Chahal Creates History: जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय संघात निवड झालेल्या युजवेंद्र चहलने मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला आयपीएल २०२४ च्या लढतीत बाद करून शानदार विक्रम रचला. राजस्थान रॉयल्सचा हा गोलंदाज सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चहलला हा पराक्रम गाठण्यासाठी केवळ एका विकेटची गरज होती आणि त्याने पंतला बाद करून ही कामगिरी केली. या लेगस्पिनरने पंतला आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा बाद केले. यासह चहलने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ३५० बळी घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने या फॉरमॅटमध्ये ३०१ व्या सामन्यात ही कामगिरी केली. या यादीत मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज पियुष चावला ३१० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो ६२५ विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा गाठणारा चहल पाचवा फिरकी गोलंदाज आणि सहावा आशियाई गोलंदाज आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत युजवेंद्र चहल ३५० विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान अव्वल स्थानी आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५७२ धावा केल्या आहेत. त्यानंतर सुनील नारायण (५४९ विकेट्स) दुसऱ्या क्रमांकावर, इम्रान ताहिर (५०२ विकेट्स) तिसऱ्या, शाकीब अल हसन ४८२ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
चहल सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज आहे, त्याने आतापर्यंत १२ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या मोसमात त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला भारतीय टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवता आले. निवड समितीने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संघाला काय अपेक्षा असू शकते हे समजून त्याचा १५ सदस्यीय संघात समावेश केला आहे.