मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हा निर्लज्जपणाचा कळस! भाजपचं घाणेरडं राजकारण थांबवायला हवं; प्रफुल्ल पटेल प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

हा निर्लज्जपणाचा कळस! भाजपचं घाणेरडं राजकारण थांबवायला हवं; प्रफुल्ल पटेल प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 29, 2024 06:46 PM IST

Anjali Damania slams Modi Govt : एअर इंडिया विमान भाडेपट्टी घोटाळा प्रकरणात प्रफुल पटेल यांना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजपनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, त्यांचं घाणेरडं राजकारण थांबवायला हवं; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
भाजपनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, त्यांचं घाणेरडं राजकारण थांबवायला हवं; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Anjali Damania attacks BJP Govt : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना साथ देणारे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची फाइल सीबीआयनं (CBI) बंद केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सीबीआयच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सत्तेसाठी भाजपनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय,' असा घणाघात त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंजली दमानिया यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी भाजप सरकारच्या काळात केंद्रीय यंत्रणांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयावर टीका केली आहे. 'आधी सिंचन घोटळ्यात अजित पवारांना क्लीन चिट दिली. त्यानंतर शिखर बँक घोटाळ्यातही क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. आता प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर जो ८४० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयात ज्याची सुनावणी सुरू होती. त्या प्रकरणाची फाइलही आता बंद करण्यात आली आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

भाजपचं हे राजकारण आता थांबवायला हवं!

‘आता लोकांनी मिळून, एकत्र येऊन या सगळ्या क्लीन चिट विरोधात याचिका दाखल करण्याची गरज आहे. हे क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडं करणं गरजेचं आहे. कारण, आज भाजप सत्तेसाठी अत्यंत घाणेरडं राजकारण करत आहे. कोणत्याही थराला जात आहे. सगळ्या थर्ड ग्रेड लोकांना पक्षात घेत आहे. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र आणायचं. त्यांचे सगळे गुन्हे माफ करायचे. हे सगळं आता कुठंतरी थांबायला हवं,’ असं आवाहन दमानिया यांनी केलं आहे.

लोकांचा रोष काय असतो ते दाखवून द्या!

‘आपला देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडं जातो आहे. विरोधी पक्षच ठेवायचा नाही अशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत. लोकांचा रोष काय असतो हे यांना दाखवून देणं गरजेचं आहे,’ असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या व भाजपशी युती करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या चौकशा आपोआप थांबल्या आहेत किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्या आहेत. यात आता प्रफुल्ल पटेल यांची भर पडली आहे. तोच धागा पकडून दमानिया यांनी जनतेला एकत्र येण्याचं आणि या सगळ्या प्रकाराला न्यायालयात आव्हान देण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

 

IPL_Entry_Point

विभाग