मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : आयपीएलमध्ये आज दिल्ली व लखनौ भिडणार, कोणते खेळाडू ठरू शकतात गेमचेंजर? पाहा!

IPL 2024 : आयपीएलमध्ये आज दिल्ली व लखनौ भिडणार, कोणते खेळाडू ठरू शकतात गेमचेंजर? पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 14, 2024 01:16 PM IST

IPL 2024 LSG vs DC match prediction : आयपीएलच्या आजच्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स हा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न करेल.

IPL 2024 : आयपीएलमध्ये आज दिल्ली-लखनऊ भिडणार, कोणते खेळाडू ठरतील गेमचेंजर? पाहा!
IPL 2024 : आयपीएलमध्ये आज दिल्ली-लखनऊ भिडणार, कोणते खेळाडू ठरतील गेमचेंजर? पाहा! (AFP)

IPL 2024, DC vs LSG : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अटीतटीची लढत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं लखनौचा १० गडी राखून लज्जास्पद पराभव केल्यानंतर आता प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनौला दिल्लीवर विजय मिळवणं आवश्यक झालं आहे. तर, दिल्लीलाही आव्हान कायम राखण्यासाठी झगडावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लखनौला अद्याप दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळं त्यांच्या आशा अद्याप कायम आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला मागील पराभव विसरून खेळ करावा लागेल. दोन्ही संघ आपापले उर्वरित सामने जिंकण्याच्या आटापिटा करणार असले तरी इतर संघांच्या निकालावर त्यांचं भवितव्य आजमावणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी काही खेळाडू गेमचेंजर ठरू शकतात. पाहूया कोण आहेत हे खेळाडू?

दिल्लीचे कॅपिटल्सचे आधारस्तंभ

अक्षर पटेल

अक्षर पटेल यंदाच्या मोसमात दिल्लीसाठी सर्वात विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. या डावखुऱ्या फलंदाजानं ११ सामन्यांत २२१ धावा केल्या आहेत आणि जवळपास ७.३७ च्या प्रभावी इकॉनॉमीच्या सरासरीनं ११ विकेट घेतल्या आहेत. रिषभ पंतच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात कर्णधारपदी विराजमान झालेल्या अक्षरनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात झुंजार अर्धशतकही झळकावलं होतं.

कुलदीप यादव

डीसीचा फिरकीपटू कुलदीप यादव यानं यंदाच्या मोसमात अनेक धडाकेबाज फलंदाजांना जाळ्यात अडकवलं आहे. कुलदीपनं १० सामन्यांत ८.६९ च्या सरासरीनं १५ बळी घेतले आहेत. अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यानं दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरला.

लोकेश राहुल

एलएसजीचा कर्णधार केएल राहुलनं १२ सामन्यात १३६ च्या स्ट्राईक रेटनं ४६० धावा केल्या आहेत. या यष्टीरक्षक फलंदाजानं यंदाच्या मोसमात तीन अर्धशतकं झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ८२ धावांची आहे.

निकोलस पूरन

कॅरेबियन संघाचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरननं आपल्या धडाकेबाज फलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे. पूरननं १२ सामन्यात ६०.५० च्या सरासरीनं आणि १६२.०५ च्या स्ट्राईक रेटनं ३६३ धावा केल्या आहेत.

लखनौ सुपर जायंट्सची भिस्त यांच्यावर

यश ठाकूर

लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर यंदाच्या मोसमात सर्वाधिक ११ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. या युवा खेळाडूच्या नावावर ५ विकेटही आहेत आणि तो खेळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घातक ठरू शकतो.

मार्कस स्टॉयनीस

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसनं यंदाच्या मोसमात अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी किल्ला सांभाळला आहे. स्टॉयनिसनं या मोसमात १२ सामन्यांत १५१.७१ च्या स्ट्राईक रेटने ३५५ धावा केल्या आहेत. या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं मध्यंतरी महत्त्वपूर्ण स्पेल टाकून संघासाठी उपयुक्त गोलंदाजी केली आहे.

हेड टू हेड

लखनौ आणि दिल्ली हे संघ या स्पर्धेत आतापर्यंत ४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी तीन सामन्यांत एलएसजीनं विजय मिळवला आहे. तर, शेवटच्या लढतीत दिल्लीनं विजय मिळवला आहे.

कुठं होणार सामना?

मागील चार सामन्यांत अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरली आहे. या सर्वच सामन्यांमध्ये २०० च्या पुढं धावसंख्या केली गेली आहे. यावर्षी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी आपापले सामने जिंकले आहेत, तर कोणत्याही संघानं दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विजय मिळवलेला नाही. त्यामुळं इथं खेळणारे संघ प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यासाठी प्रथम फलंदाजी करून धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

कोणाला किती संधी?

दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळं आज विजय मिळवून आत्मविश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दिल्लीविरुद्ध एलएसजीनं आघाडी घेतली असली, तरी मागील लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीनं आपला शेवटचा सामना जिंकला असला तरी झुंजार एलएसजीविरुद्ध त्यांना आणखी एक विजय मिळण्याची गरज आहे. गुगल विन प्रीडिक्टरनुसार, दिल्ली संघ एलएसजी विरुद्धचा सामना जिंकण्याची शक्यता ५३ टक्के आहे.

ड्रीम इलेव्हन संघ

जॅक फ्रेजर मॅकगर्क (कर्णधार), अभिषेक पोरेल, मार्कस स्टोइनिस, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), अक्षर पटेल, ट्रिस्टियन स्टब्स, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, नवीन उल हक, मुकेश कुमार, इशांत शर्मा.

IPL_Entry_Point