मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  praful patel news : प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बंद, सीबीआयचा निर्णय

praful patel news : प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बंद, सीबीआयचा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 29, 2024 11:22 AM IST

cbi clean chit to praful patel : यूपीए सरकारच्या काळात झालेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात सीबीआयनं तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल व अन्य आरोपींना क्लीन चिट दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बंद, सीबीआयचा निर्णय
प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बंद, सीबीआयचा निर्णय (PTI)

CBI on praful patel corruption case : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७ मधील भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयनं (CBI) पटेल यांना क्लीन चिट दिली आहे.

मे २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयनं प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एअर इंडियासाठी विमानं भाड्यानं घेताना पटेल यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी पटेल यांच्यासह नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

तब्बल सात वर्षांच्या तपासानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयनं हा तपास बंद केला आहे. पटेल यांच्यासह तत्कालीन नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना सीबीआयनं क्लीन चिट दिली आहे. सीबीआयने मार्च २०२४ मध्ये न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला.

प्रफुल्ल पटेल सध्या भाजपसोबत

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला साथ देत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना- एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांमध्ये प्रफुल्ल यांचा समावेश आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?

संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते. त्यावेळी यांनी पदाचा गैरवापर करून एअर इंडियासाठी मोठ्या प्रमाणात विमानं भाड्यानं घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. एअर इंडियासाठी विमान खरेदीचा कार्यक्रम सुरू असतानाही ही विमानं भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप सीबीआयनं केला होता.

'भाडेतत्त्वावर विमानं खरेदी करण्यासाठी केलेल्या भाडेकरारात टर्मिनेशन क्लॉज नव्हता. त्यामुळं एनएसीआयएलला लीज करार रद्द करणं शक्य नव्हतं. कारण, त्यासाठी एनएसीआयएलला सर्व खर्च आणि भाडेभाड्यातील फरकाची रक्कम भरावी लागली असती, असं चौकशीत समोर आलं. एअर इंडियासाठी १५ महागडी विमानं भाड्यानं देण्यात आली होती, त्यासाठी त्यांच्याकडं वैमानिकही तयार नव्हते, त्यामुळं कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं तपासात समोर आलं होतं.

नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांची माफी मागावी!

प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट देण्याच्या सीबीआयच्या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'पटेल यांना मिळालेल्या क्लीन चिटचा अर्थ भाजपनं यूपीए-२ वर केलेला हायप्रोफाइल आरोप बोगस आणि खोटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, असं रमेश यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग