आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का लागला आहे. त्यांचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलर उर्वरित सामने खेळणार नसल्याची बातमी येत आहे. बटलर इंगलंडला परतला आहे.
वास्तविक, लवकरच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ४ टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू मायदेशी बोलावले आहेत.
२२ मे ते ३० मे दरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ४ टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर T20 विश्वचषक सुरू होईल, ज्यामध्ये बटलर इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत 'X' खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जोस बटलर हॉटेल सोडताना दिसत आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली आणि कारमध्ये बसल्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्सला ट्रॉफी जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बटलरच्या जाण्याचा हा व्हिडिओ खूपच भावूक करणारा आहे. कारण बॅकग्राऊंडमध्ये 'मैनु विदा करो' हे गाणे वाजत आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येकजण जोस भाईला खूप मिस करेल.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक, फिल सॉल्ट आणि रीस टोपले यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडूही इंग्लंडला परतू शकतात.
बेअरस्टो आणि करन सध्या पंजाब किंग्जकडून खेळत आहेत, पण त्यांचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, विल जॅक आणि रीस टोपले आरसीबीच्या प्लेऑफच्या आशांना धक्का देऊ शकतात. फिल सॉल्ट आणि मोईन अली यांनी गेल्या सामन्यांमध्ये केकेआर आणि सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली आहे.
जोस बटलर इंग्लंडला परतण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी करत होता. बटलरने या मोसमात ११ सामन्यांमध्ये ३५९ धावा केल्या आहेत आणि यंदाच्या मोसमात २ शतके करणारा तो आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. गुणतालिकेत राजस्थान सध्या १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचे अजून २ सामने बाकी आहेत. एका विजयाने त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.
संबंधित बातम्या