मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 :रोहित-आगरकरला हार्दिक नको होता, 'दबाव'मुळे झाली वर्ल्डकप संघात निवड

T20 WC 2024 :रोहित-आगरकरला हार्दिक नको होता, 'दबाव'मुळे झाली वर्ल्डकप संघात निवड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 13, 2024 03:38 PM IST

T20 World Cup 2024 : आयपीएल २०२४ पूर्वी रोहितला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवून मुंबई इंडियन्सने सुरू केलेला वाद अजूनही संपलेला नाही. आता या दोन खेळाडूंमधील खराब केमिस्ट्री आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये अडचणीची ठरू शकते.

T20 World Cup 2024 :  रोहित-आगरकरला हार्दिक नको होता, 'दबाव'मुळे झाली वर्ल्डकप संघात निवड
T20 World Cup 2024 : रोहित-आगरकरला हार्दिक नको होता, 'दबाव'मुळे झाली वर्ल्डकप संघात निवड (PTI)

टी-20 विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, आयपीएल २०२४ पूर्वी रोहितला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवून मुंबई इंडियन्सने सुरू केलेला वाद अजूनही संपलेला नाही. आता या दोन खेळाडूंमधील खराब केमिस्ट्री आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये अडचणीची ठरू शकते.

मुंबई आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे आणि त्यांचे ४ खेळाडू रोहित, हार्दिक, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे भारतीय वर्ल्डकप संघाचे सदस्य आहेत. 

पण मुंबई इंडियन्सचा संघ दोन गटात विभागलेला दिसत आहे. ईडन गार्डन्सवर केकेआर विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाही हे स्पष्टपणे दिसून आले. रोहित शर्मा सरावासाठी आला तेव्हा हार्दिक तेथे उपस्थित नव्हता. सरावानंतर रोहित डगआऊटजवळील फ्रीजवर बसला होता, तेव्हा सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्यासह अनेक खेळाडू त्याच्या आजूबाजूला होते, पण जेव्हा हार्दिक पांड्या फलंदाजीचा सराव करण्यासाठी नेटवर पोहोचला तेव्हा रोहितसह इतर खेळाडू उठून दुसऱ्या बाजूला गेले. 

तसेच, यादरम्यान एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यात रोहित केकेआरच्या कोच अभिषेक नायरसोबत बोलताना दिसत होता. यात रोहित काही गोष्टी बदलत असल्याचे म्हणताना ऐकू येत आहे.

रोहितला अधिक सपोर्ट

तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स संघातील बहुतेक खेळाडू रोहितच्या समर्थनात आहेत, तर परदेशी खेळाडू कर्णधार पंड्याच्या सूचनांचे पालन करतात. यामुळे यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली.

मुंबईने ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधार रोहितला हटवून संघाची कमान हार्दिककडे सोपवली तेव्हा त्याच्या चाहत्यांनाही हा निर्णय आवडला नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पांड्याला प्रेक्षकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आणि सोशल मीडियावरही त्याला चांगलेच ट्रोल केले गेले. पण कालांतराने सर्व काही सुरळीत होईल अशी आशा होती, परंतु वाद अद्याप शमलेला नाही.

पंड्याची निवड दबावाखाली

विश्वचषकात रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक उपकर्णधार असेल. भारताचा सामना ५ जूनला आयर्लंडशी तर याच्या ४ दिवसांनी पाकिस्तानशी होणार आहे.

पण त्याआधी टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघ निवडीची बैठक अहमदाबादमध्ये मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झाली, तेव्हा आगरकर आणि कर्णधार रोहितसह अनेक निवडकर्ते हार्दिकची संघात निवड करण्याच्या बाजूने नव्हते.

मात्र, प्रचंड दबावामुळे हार्दिकची संघात निवड झाली, सोबतच त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले.

रोहित टी-20 क्रिकेट सोडू शकतो

टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित हा फॉरमॅट सोडू शकतो, असे मानले जात आहे. बोर्ड हार्दिकचा भविष्यातील टी-20 कर्णधार म्हणून विचार करत आहे. गेल्या टी-20 विश्वचषकानंतर हार्दिकला अनेक टी-20 मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व देण्यात आले आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानेही चमकदार कामगिरी केली.

मात्र, आता वातावरण बदलले आहे. रोहित हार्दिकला वर्ल्डकपमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी काही खास राहिली नाही आणि त्याने १२ सामन्यांत केवळ १९८ धावा केल्या आणि ११ विकेट्स घेतल्या. पहिल्या ७ सामन्यांत त्याला केवळ ४ विकेट घेता आल्या होत्या. 

IPL_Entry_Point