गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार-writer director mahesh tilekar wrote cryptic post on govinda after he joins political party ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार

गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार

Mar 29, 2024 09:26 AM IST

‘कला संस्कृतीसाठी काम करणार’, असं गोविंदानं म्हटलं आहे. मात्र, गोविंदाचे हे बोल ऐकून चित्रपट लेखक-निर्माते महेश टिळेकर त्याच्यावर चांगलेच वैतागले आहेत.

ज्येष्ठ कलाकारांना त्रास देऊन संस्कृतीचे किती भान ठेवले?; महेश टिळेकरांनी सांगितले गोविंदाचे किस्से
ज्येष्ठ कलाकारांना त्रास देऊन संस्कृतीचे किती भान ठेवले?; महेश टिळेकरांनी सांगितले गोविंदाचे किस्से

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. नुकताच अभिनेत्याने शिवसेनेत प्रवेश केला. तर, आता तो यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मैदानात उतरणार आहे. ‘कला संस्कृतीसाठी काम करणार’, असं यावेळी गोविंदाने म्हटलं आहे. मात्र, गोविंदाचे हे बोल ऐकून चित्रपट लेखक-निर्माते महेश टिळेकर त्याच्यावर चांगलेच वैतागले आहेत. एक पोस्ट लिहित महेश टिळेकर यांनी गोविंदाच्या जुन्या बेशिस्त वर्तनाचा पाढाच वाचून दाखवला आहे. महेश टिळेकर यांनी गोविंदाचे अनेक किस्से शेअर केले आहेत.

महेश टिळेकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘कला संस्कृतीसाठी काम करणार गोविंदा? खरं तरं त्याने पुन्हा राजकारणात येणं, एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणं याला विरोध नाहीच. पण, राजकीय प्रवेश करताना जे कारण सांगितलं त्यानं की, कला संस्कृतीसाठी तो राजकारणात परत येत आहे, हे ऐकून याची अवस्था म्हणजे ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या' अशी आहे. यशाच्या शिखरावर असताना जेव्हा गोविंदा स्टार होता, तेव्हा ही त्याला कला संस्कृतीसाठी काम नक्कीच करता आलं असतं. तेव्हा तर त्याचं नाव खूप होतं, पण तेव्हा हे असलं काही का सुचू नये त्याला? ज्या कला, संस्कृतीची भाषा हा आता करतोय, तेव्हा तो ज्या अभिनय क्षेत्रात काम करत होता, त्या कला क्षेत्रातील लोकांबरोबर (निर्माते, दिग्दर्शक, सह कलाकार) यांच्या बरोबर हा कसा वागला, किती माज दाखवला हे त्याने आठवून पहावं. त्याच्या बरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्याच्या शूटिंगला उशिरा येण्यानं, कधी कधी तर न येण्यानंही निर्माता दिग्दर्शक यांचं किती नुकसान झालं, याचा त्याने निदान आता उतरत्या काळात तरी विचार करावा.’

परदेशातही वाजणार मराठीचा डंका; कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड!

गोविंदामुळे निर्माते व्हायचे हैराण

पुढे त्यांनी लिहिले की, ‘त्याच्या बरोबर हिरोईन म्हणून काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने सांगितलेला किस्सा तर आजही आठवतोय मला, आऊटडोअर शुटिंगसाठी जाताना गोविंदाची फ्लाईट ९ची असेल तर, त्या नंतरच्या ज्या फ्लाईट असतील त्याचंही बुकिंग निर्मात्याला करून ठेवावं लागायचं. कारण, हा ९च्या फ्लाईटला वेळेवर पोहोचेलच याची शाश्वती नसायची. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी तर गोविंदा बरोबर काम करतानाचा एक अनुभव मला खूप वर्षांपूर्वी सांगितला होता. एका सिनेमात सीमा देव, कादरखान यांच्या बरोबर गोविंदा हिरो होता. शूटिंगच्या एका दिवशी सकाळी ९ वाजता येणं अपेक्षित असलेला हा स्टार संध्याकाळी ४ वाजता सेट वर पोहचला. पोहचल्यावर सीमा देव यांना उशिरा येण्याचं कारण सांगितलं की, टीव्हीवर मीनाकुमारी यांचा एक अप्रतिम सिनेमा लागला होता. तो पाहत असताना वेळेचं भान राहिलं नाही त्याला...’

आशा पारेख यांच्या निवृत्तीचं कारण

‘ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी अभिनयातून निवृत्ती घेण्याला कारणीभूत गोविंदा असल्याचं बोललं जातं. एका चित्रपटात आशा पारेख, शशी कपूर आणि गोविंदा होते. हॉस्पिटलचा एक सीन होता, सकाळपासून सगळे कलाकार गोविंदाची वाट पहात होते. सीनसाठी शशी कपूर यांना स्ट्रेचरवर झोपवण्यात आले होते. गोविंदा आला आणि ‘चलो टेक करते है’ असं म्हणाला तसे, स्ट्रेचरवरून उठत ‘मेरा पॅकअप हो गया’ असं म्हणत शशी कपूर रागाने जाऊ लागले. पण, इतका मोठा सिनियर कलाकार आपल्यामुळे चिडला आहे, आपण त्यांना अनेक तास ताटकळत ठेवले आहे, याचे कसलेच भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही. माफी मागणे तर दूरच.. काही काळ तर त्याने त्याचा वैयक्तिक एक ज्योतिषी पण ठेवला होता आणि तो सांगेल तसं हा वागायचा, ज्यामुळे इतरांच्या मात्र नाकीनऊ यायचे’, असे महेश टिळेकर म्हणाले.

वैताग आलाय सीरिअल बघायचा; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर का भडकलेयत प्रेक्षक? पाहा काय म्हणतायत...

सौजन्याचा मुखवटा घातला तरी सिनेमात काम मिळणं कठीण!

‘फिल्म इंडस्ट्रीत नेहमी 'चलती का नाम गाडी' ही रीतच आहे. एखादा स्टार यशाच्या शिखरावर असताना, त्याच्यामुळे सिनेमे हिट होतात म्हणून त्या त्या वेळी त्याला सहन केले जाते. पण, एकदा का उतरती कळा लागली की, मग त्याच एकेकाळच्या स्टारला कुणी विचारत नाही. आधीच्या स्वभावामुळे नंतर तुम्ही कितीही सौजन्याचा मुखवटा घातला तरी सिनेमात काम मिळणं कठीण होतं. लोकांचं आटलेले प्रेम आणि ओसरलेली लोकप्रियता एकेकाळच्या अशा स्टारला खायला उठते. मग जनमानसात पुन्हा येण्यासाठी कलाकारांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, कला संस्कृती जपण्याची इच्छा अशी गोंडस नावे घेऊन लोकांसमोर यायची धडपड सुरू होते. आपण स्टार असताना जेष्ठ श्रेष्ठ आणि सहकलाकारांना त्रास देऊन कलेचं, संस्कृतीचे किती भान ठेवले हा प्रश्न आरशात पाहून स्वतःला विचारून बघावा.. आणि मागच्या केलेल्या चुका सुधारण्यासाठी ही चांगली संधी आहे, असं मानून आपलं योगदान द्यावं’, असं टिळेकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Whats_app_banner